
अमरावती, 01 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात झालेल्या भीषण अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या तीन नवजात बालकांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत
वितरित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मृत बालकांच्या पालकांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
२४ ऑगस्ट रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क झाल्याने आग लागली होती. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बालके गंभीर जखमी झाली होती. घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. तसेच जखमी बालकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्याचे निर्देश दिले होते. घटनेनंतर आठ दिवसांनी सोमवारी मृत बालकांच्या पालकांना शासनाच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. यामध्ये पुलगाव येथील गाडगेनगर परिसरातील पूजा स्वप्निल बोरगे, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड येथील गायत्री प्रफुल चोपडे तसेच चिखलदरा तालुक्यातील बोराळा येथील किरण बेठेकर, गंगाराम बेठेकर यांचा समावेश आहे. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी