बीड : क्रेटा कारमधून तब्बल ७० किलो गांजा जप्त; ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बीड, 10 सप्टेंबर (हिं.स.)।बीड शहरात अंमली पदार्थांची अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ७० किलो गांजा जप्त केला आहे. गांजाची किंमत सुमारे ३५ लाख रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या क्रेटा कारसह एकूण ५० लाख
पोलीस कारवाई


बीड, 10 सप्टेंबर (हिं.स.)।बीड शहरात अंमली पदार्थांची अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ७० किलो गांजा जप्त केला आहे. गांजाची किंमत सुमारे ३५ लाख रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या क्रेटा कारसह एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाकडून बीड शहरात पेट्रोलिंग सुरू असताना खामगाव मंदिर रोड परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारमधून गांजाची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित क्रेटा कारची तपासणी केली.तपासणीदरम्यान कारमध्ये जवळपास ७० किलो अंमली पदार्थ (गांजा) आढळून आला. हा गांजा वेगवेगळ्या गोणी व पॅकेटमध्ये बांधून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी गांजा जप्त करत त्याची किंमत सुमारे ३५ लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली क्रेटा कार, किंमत अंदाजे १५ लाख रुपये, असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणात गांजाची वाहतूक करणाऱ्या मोसीन खान वाहब शेख (वय ३१ वर्षे, रा. ताज नगर, ता. जि. अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. १९१/२०२६, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या गांजाचा पुरवठा कुठून झाला, तो कोणाला देण्यात येणार होता तसेच या अवैध अंमली पदार्थांच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास बीड शहर पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या कारवाईतून गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येते का, याकडे लक्ष लागले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/शितलतुकुमार बल्लाळ, पोलीस ठाणे शिवाजीनगरचे सपोनि/लके तसेच पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार महेश जोगदंड, दिलीप गिते, बप्पासाहेब घोडके, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande