पर्यूषण काळात मीरा-भाईंदरमध्ये विद्यार्थ्यांच्या डब्यात कंदमुळांच्या भाज्यांवर बंदी!
* आ. नरेंद्र मेहता यांच्या शाळेचा तुघलकी आदेश, पालकांसह मनसे आक्रमक मुंबई, १० सप्टेंबर (हिं.स.) : पर्यूषण काळात मीरा-भाईंदरमध्ये मासे, मटण विक्रीवर महापालिकेने बंदी घातली आहे. त्या पाठोपाठ आता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ''सेव्हन स्क्वेअर अकॅ
सेव्हन स्क्वेअर अकॅडमी कंदमुळे बंदी


* आ. नरेंद्र मेहता यांच्या शाळेचा तुघलकी आदेश, पालकांसह मनसे आक्रमक

मुंबई, १० सप्टेंबर (हिं.स.) : पर्यूषण काळात मीरा-भाईंदरमध्ये मासे, मटण विक्रीवर महापालिकेने बंदी घातली आहे. त्या पाठोपाठ आता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन स्क्वेअर अकॅडमी' या शाळेने तुघलकी आदेश काढला आहे. शाळा व्यवस्थापनाने पर्यूषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, बटाटा, लसूण, बीट आदी कंदमुळांच्या भाज्या आणण्यावर बंदी घातली आहे. शाळेच्या अ‍ॅपवरून विद्यार्थी आणि पालकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या या तुघलकी कारभाराविरोधात पालकांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. हा मेसेज काही पालकांनी मनसेचे सचिन पोपळे यांना पाठवल्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली.

जैन धर्मीयांच्या पर्यूषण पर्वाला १६ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. या काळात जैन धर्मीय कांदा, लसूण, बटाटा आदी कंदमुळे वर्ज्य करतात. पर्यूषण काळात मीरा-भाईंदर महापालिकेने संपूर्ण शहरात दोन दिवस मासे, मटणाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याला मीरा-भाईंदरमधील भूमिपुत्र नागरिक आणि मराठी एकीकरण समितीने कडाडून विरोध केल्याने गदारोळ उठला आहे. दरम्यान, आज भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेने एक तुघलकी आदेश जारी केला.

सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत सर्व जाती-धर्मांची मुले शिकतात. त्यांचा धर्म, संस्कृती, परंपरा आणि आहार वेगळा आहे. मात्र तरीही सगळे एकोप्याने राहतात. परंतु कोणत्याही एका धार्मिक परंपरेच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांच्या आहारावर निर्बंध का लादले आहेत, असा सवाल मनविसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष रॉबर्ट डिसोझा यांनी केला. त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार केली असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

काय आहे आदेश?

पर्यूषण काळात आहाराच्या निवडीबाबत शाळेने अ‍ॅपवरून सूचनापत्रक पाठवले आहे. या काळात विद्यार्थ्यांनी जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या जसे कांदा, लसूण, बटाटा, बीट आदी कंदमुळे आहारात टाळावीत. या कंदमुळांचा समावेश असलेल्या भाज्या डब्यातून आणू नयेत. त्याचबरोबर शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण, बटाटा आणि बीट असलेले कोणतेही पदार्थ मिळणार नाहीत, असे या सूचनापत्रकात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande