
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
आपले सर्व सण-उत्सव पर्यावरणपूरक साजरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मातीच्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सोलापूरच्या स्थानिक मूर्तिकारांनी बनवलेल्या या गणेशमूर्तींचे प्रदर्शन विजापूर रोडवरील पत्रकार भवन सभागृहात सुरू आहे. इको फ्रेंडली क्लबच्यावतीने मातीच्या गणेशमूर्तींसोबत सीड बॉल दिले जाणार आहेत.
इको फ्रेंडली क्लबच्यावतीने वर्षभर पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवले जातात. गेल्या दहा वर्षापासून अधिक काळ इको फ्रेंडली क्लब आपले सर्व सण - उत्सव पर्यावरणपूरक साजरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी सोलापूरचे मूर्तिकार विष्णू सगर, आशिष माशाळे आणि किरण सगर यांच्याकडून शाडू आणि लाल मातीच्या सुंदर इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवून घेतल्या आहेत. यात दगडूशेठ, लालबागचा राजा, चिंतामणी, शेठजी गणपती, लंबोदर यासह विविध प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत. पाणी प्रदूषित होते. जलचरांना धोका निर्माण झाला आहे. इको फ्रेंडली म्हणजेच मातीच्या गणेशमूर्ती तासाभरात विरघळतात, आपण या मूर्तींचे घरीच स्वच्छ पाण्यात विसर्जन करू शकतो. गेल्या दहा वर्षांपासून इको फ्रेंडली क्लबकडून इको फ्रेंडली गणेशमूर्तींचे प्रदर्शन भरवले जात आहे. यंदा विजापूर रोडवरील पत्रकार भवन सभागृहात इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आजवर शेकडो पर्यावरणस्नेही सोलापूरकरांनी मातीच्या गणेशमूर्तींची नोंदणी केली आहे.
मातीच्या गणेशमूर्तींसोबत सर्वांना सीड बॉल म्हणजे बीज गोळे दिले जाणार आहेत. हे सीड विविध फळांच्या बियांपासून बनवले आहेत. या माध्यमातून सोलापूर परिसरात झाडांची संख्या वाढावी हा इको फ्रेंडली क्लबचा प्रयत्न आहे. सोलापूरकरांनी इको फ्रेंडली बाप्पाच्या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन अजित कोकणे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड