
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
गुळवंची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्याने शाळेच्या प्रशासकीय कामकाजासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक मुख्याध्यापकांचे अतिरिक्त प्रशासकीय कामकाज पाहत आहेत. त्यामुळे त्यांना वारंवार वर्ग सोडून कार्यालयीन कामासाठी जावे लागत असून, परिणामी विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी आणि शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्यासाठी अपेक्षित वेळ मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास, गुणवत्ता आणि शैक्षणिक प्रगती महत्त्वाची असताना शिक्षकांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी पडल्याने अध्यापनाचा वेळ कमी होणे ही चिंतेची बाब असल्याचे पालकांनी सांगितले.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शहाजीराजे बोराडे यांनीही या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शाळेत कायमस्वरूपी मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच शिक्षकांना त्यांच्या अध्यापनाच्या कामावर पूर्ण लक्ष देता यावे, यासाठी मुख्याध्यापकांची नियुक्ती लवकरात लवकर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुळवंची येथे कायमस्वरूपी मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे.
ही मागणी कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळेचे सुरळीत प्रशासन यासाठी असल्याचे शहाजीराजे बोराडे यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड