
पुणे, 10 सप्टेंबर (हिं.स) |
केंद्र शासनाच्या विविध योजना व प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना प्रलंबित कामांसाठी स्पष्ट उद्दिष्ट आणि कालमर्यादा निश्चित करून ती तातडीने पूर्ण करावीत, तसेच चांदणी चौक घोटवडे फाटा पिरंगुट हिंजवडी मेट्रोचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक झाली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा तसेच मागील बैठकीतील निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे, विधान परिषद सदस्य डॉ.नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, हेमंत रासने, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावांना गती देताना वनाज-चांदणी चौक उन्नत मार्गासाठी पुणे महापालिकेची आर्थिक सहमती, रामवाडी-वाघोली मार्गिकेच्या आराखड्याला आवश्यक मान्यता आणि लोहगाव विमानतळ मेट्रो जोडणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले. तसेच चांदणी चौक, घोटवडे फाटा पिरंगुट हिंजवडी मेट्रोचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्याला अनुमोदन दिले हा मार्ग आवश्यक असल्याचे सांगितले. विमानतळा कडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे लवकरात लवकर पूर्ण करा. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या वाढल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत पुणे महापालिकेकडे प्राप्त अर्जांची छाननी झाली असून ३,२२७ अर्ज पात्र ठरले आहेत. मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे व चोविसावाडी येथील सुमारे ६,८०० घरांशी संबंधित भूसंपादन व हस्तांतरणाची प्रक्रिया कालबद्ध करा तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात ९१.५९ टक्के पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात ३८,४६५ पैकी ९,२५८ घरे पूर्ण, तर २९,२०७ घरे प्रगतीपथावर आहेत. प्रत्येक तालुक्याला मासिक उद्दिष्ट निश्चित करून कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भारतनेट अंतर्गत पुणे बिझनेस एरियात १,४९० कार्यरत जोडण्या आणि १,३६६ ग्राहक जोडण्या कार्यान्वित आहेत. जिल्ह्यातील सुमारे १,४०० ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी वर्षनिहाय व तालुकानिहाय कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर भारतनेट उद्योजक नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवा, असेही ते म्हणाले.
__________
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु