
डोंबिवली, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेशोत्सवासाठी कोकणासह राज्यातील विविध भागात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्या तब्बल ९०० हून अधिक एसटी बसेस विविध जिल्ह्यांकडे रवाना होणार आहेत. या उपक्रमामुळे सुमारे ४५ हजार गणेशभक्तांना प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
याबाबत शिवसेना पदाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमधून या बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये डोंबिवलीतून सुमारे ३५०, कल्याण पूर्वेतून २१०, तर दिव्यातून १५० हून अधिक बसेस रवाना होणार आहेत. याशिवाय अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा परिसरातूनही बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
डोंबिवली आणि दिवा परिसरासाठीच्या सुमारे ५०० बसेस गुरुवारी दुपारपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील एसटी आगारांतून कल्याण-शीळ रोडवरील सामंत पेट्रोल पंपासमोरील परिसरात दाखल होणार आहेत. त्यानंतर या बसेस प्रीमियर कंपनी मैदान, संदप, दिवा रोड येथे आणण्यात येतील. गणेशभक्तांनी केलेल्या नोंदीनुसार संबंधित भागांमध्ये या बसेस पाठविण्यात येणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून या बसेस कोकणातील रायगड, खेड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराडच्या दिशेने रवाना होतील.
गणेशभक्तांच्या वाढत्या मागणीनुसार यावर्षी कोकणाबरोबरच सातारा, सांगली, कराड आणि कोल्हापूर या भागांसाठीही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, युवासेना आणि महिला सेनेचे कार्यकर्ते गेल्या महिनाभरापासून नियोजन आणि व्यवस्थापनाच्या कामात कार्यरत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi