सोलापूरातील गाळेधारकांना महापौरांचा दणका
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी भूमी-मालमत्ता विभागाच्या अखत्यारित असलेल्या मेजर व मिनी गाळ्यांची थकबाकी वसुली तातडीने करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक
Jsjd


सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी भूमी-मालमत्ता विभागाच्या अखत्यारित असलेल्या मेजर व मिनी गाळ्यांची थकबाकी वसुली तातडीने करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गाळ्यांची सद्यस्थिती, थकबाकी, वसुली आणि थकबाकीदारांवर करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या मालकीचे एकूण किती मेजर व मिनी गाळे आहेत, त्यापैकी किती गाळेधारक नियमित भाडे व इतर देयके भरत आहेत, किती गाळ्यांची थकबाकी प्रलंबित आहे, तसेच थकबाकीदारांना बजावलेल्या नोटिसांची संख्या याबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

तसेच थकबाकी असलेल्या गाळ्यांपैकी किती गाळ्यांवर सीलची कारवाई झाली, किती गाळ्यांकडून वसुली झाली आणि अद्याप किती रक्कम वसूल होणे बाकी आहे, याचाही आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत गाळेधारकांकडून झालेल्या वसुलीची माहितीही बैठकीत घेण्यात आली.

“महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी थकबाकी वसुलीला प्राधान्य द्या,” अशा स्पष्ट सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नोटिसा बजावलेल्या गाळेधारकांकडून लवकरात लवकर थकबाकी वसूल करावी. तसेच उर्वरित सर्व थकबाकीदारांकडूनही नियमानुसार वसुलीची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महापालिकेच्या मालमत्तेचा योग्य वापर होण्यासोबतच महापालिकेच्या तिजोरीत उपलब्ध असलेली सर्व देय रक्कम जमा होणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने प्रभावी नियोजन करून सातत्याने पाठपुरावा करावा आणि गरजेनुसार नियमानुसार कारवाई करावी, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande