
सोलापूर, 10 सप्टेंबर (हिं.स.)।
प्रभाग क्रमांक २३ मधील आरटीओ परिसरात झालेली वृक्षतोड थांबवून तोडण्यात आलेल्या १५ वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संवर्धनासाठी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी पुढाकार घेतला आहे.
पुनर्लागवड केलेल्या वृक्षांची पाहणी करण्यासाठी उपमहापौर देवकर यांनी आरटीओ परिसराला भेट दिली. यावेळी वृक्षांच्या देखभालीसाठी आवश्यक व्यवस्था पुरेशी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित मक्तेदार तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमित पाणी, आधार आणि आवश्यक संवर्धन व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
“केवळ वृक्षांची पुनर्लागवड करणे पुरेसे नाही; ते वृक्ष जगले पाहिजेत आणि त्यांचे योग्य संवर्धन झाले पाहिजे,” अशी भूमिका उपमहापौर देवकर यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी, परिवहन निरीक्षक विशाल यादव, उद्यान व मंडई समिती सभापती राजशेखर पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड