एससी-एसटी शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचनाची विशेष मोहीम
१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन रायगड, ११ सप्टेंबर (हिं.स.) : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक प
Avail the benefits of ‘More Crop Per Drop’; October 15 is the deadline for SC/ST farmers.


१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

रायगड, ११ सप्टेंबर (हिं.स.) : अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी योजनेला निधी उपलब्ध झाला असून, पात्र शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा लाभ घेता येणार आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी या पद्धती उपयुक्त ठरत असल्याने गरजू शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

इच्छुक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूक व पूर्ण स्वरूपात भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास संबंधित अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. प्राप्त अर्जांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी, आवश्यक शासकीय ओळखपत्रे, बँक पासबुक तसेच संबंधित जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला या योजनेचा लाभ कमाल पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत घेता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करताना अडचण आल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या सामूहिक सेवा केंद्र (सीएससी), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता निर्धारित कालावधीत ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande