
मराठवाड्यात 3 लाख 16 हजार तर बीडमध्ये 2 लाख 10 हजार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप
बीड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, बीड जिल्ह्याने या प्रक्रियेत आघाडी घेतली आहे. शिंदे समितीच्या स्थापनेपासून 7 सप्टेंबर 2026 पर्यंत बीड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 2 लाख 10 हजार 941 अजापैकी तब्बल 2 लाख 10 हजार 931 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही अर्ज प्रलंबित नाही. मराठवाड्यात एकूण 3 लाख 17 हजार 569 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 3 लाख 16 हजार 977 प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. म्हणजेच सुमारे 99.8 टक्के अर्जावर कार्यवाही पूर्ण झाली आहे.
जालना, हिंगोली आणि बीड या तीन जिल्ह्यांत एकही अर्ज प्रलंबित नसल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील अर्जावर जवळपास शंभर टक्के कार्यवाही पूर्ण झाल्याने जिल्ह्याची कामगिरी विशेष ठरली आहे. दरम्यान, जात पडताळणीसाठी मराठवाड्यात प्राप्त 21 हजार 51 प्रकरणांपैकी 16 हजार 110 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये बीडमधील 13 हजार 774 पैकी 11 हजार 437 प्रकरणांचा समावेश आहे. मराठा समाजाला 10 टक्के एसईबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने 2024 ते 2026 या तीन वर्षांत मराठवाड्यात 2 लाख 95 हजार 305 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 2025 मध्ये सर्वाधिक 1 लाख 34 हजार 460 प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत.
---------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis