एआयच्या बनावट वाघाच्या फोटोने अमरावतीत खळबळ; तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्हा एका वाघिणीच्या दहशतीखाली होता. वीस दिवसांत चार बळी गेल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. चांदूर बाजार तालुक्यात चोवीस तासांत या वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यातच
‘एआय’च्या मदतीने बनवलेले वाघाचे छायाचित्र प्रसारित करणे पडले महागात; तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल


अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्हा एका वाघिणीच्या दहशतीखाली होता. वीस दिवसांत चार बळी गेल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. चांदूर बाजार तालुक्यात चोवीस तासांत या वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यातच वाघिणीचाही बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन दिल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर एक अध्याय संपला. पण, अचानकपणे काल ऐन पोळ्याच्या दिवशी समाज माध्यमांवर चांदूर बाजार तालुक्यातीलच एका शेतात वाघ असल्याचे छायाचित्र प्रसारित झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

ज्या युवकाच्या समाज माध्यमांवरील अकाउंटवरून हे छायाचित्र प्रसारित करण्यात आले, त्याची चौकशी करण्यात आली. त्यानेही सुरूवातीला हे छायाचित्र खरे असल्याचे सांगितले. पोलिसांनी ही माहिती वन विभागाला दिली. वनविभागाचे पथक शेतात पोहचले. दरम्यान, परिसरातील गावांमध्ये दवंडी देत ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. वन विभागाच्या पथकाला परिसरात वाघाचे कुठल्याही प्रकारचे पावलांचे ठसे आढळून आले नाहीत. पोलिसांनी नंतर या युवकाची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने गंमत म्हणून वाघाचे छायाचित्र ‘एआय’च्या माध्यमातून तयार केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी या प्रकरणी शेख समीर शेख आझाद (२४, रा. देऊरवाडा) याच्या विरोधात वनपाल प्रदीप तलखंडकर यांच्या तक्रारीच्या आधारे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या परिसरात आधीच स्थिती संवेदनशील होती. वाघिणीच्या हल्ल्यात चोवीस तासांत दोन जणांना मृत्यू झाला होता. त्यातच हे बनावट छायाचित्र प्रसारित झाल्याने पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि सरकारी यंत्रणेला देखील बराच त्रास सहन करावा लागला. अखेर या युवकाने देखील समाज माध्यमांवर ‘एआय’च्या माध्यमातून वाघाचे बनावट छायाचित्र प्रसारित केल्याबद्दल माफी मागितली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande