

- काळी-पिवळी मारबतचे नेहरू चौकात पारंपरिक मिलन
- परदेशी राजनैतिक प्रतिनिधींसह मान्यवरांची उपस्थिती
नागपूर, 11 सप्टेंबर (हिं.स.) : आसमंत निनादून सोडणाऱ्या ताशांचा कडकडाट, ‘घेऊन जा रे गे मारबत’च्या घोषणांनी दुमदुमलेले रस्ते, गुलालाची उधळण आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा जनसागर अशा उत्साहपूर्ण वातावरणात नागपूरच्या सुमारे 150 वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेला मारबत-बडगा महोत्सव यंदा दिमाखात पार पडला. इतवारीतील नेहरू पुतळा चौकात काळी आणि पिवळी मारबतचे पारंपरिक मिलन झाले आणि हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात लाखो नागरिकांची गर्दी उसळली होती.
नागपुरातील नेहरू चौक परिसरातील इमारतींच्या गच्ची, छत आणि गॅलऱ्या नागरिकांनी गच्च भरल्या होत्या. मारबतच्या मिलनाचा क्षण टिपण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या निनादात मारबत मिरवणूक पुढे सरकत असताना संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.मारबत मिरवणुकीतील बडगे हे दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. सामाजिक प्रश्न, वाढती महागाई, प्रशासनातील प्रवृत्ती, राजकीय घडामोडी आणि समाजातील विविध समस्यांवर उपरोधिक भाष्य करणाऱ्या बडग्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.यंदाच्या मिरवणुकीत ‘मोबाईलवाली बुवा’ हा विशेष चर्चेचा विषय ठरला. त्यासोबत ‘काँक्रोच जनता पार्टी’, ‘रहमान डकैत’, पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यावर टीका करणारा बडगा आणि युवकांमधील वाढत्या नशेच्या प्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या बडग्यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधले.बडगे रस्त्यांवरून पुढे सरकताच ताशांच्या तालावर नागरिकांचा उत्साह वाढत गेला. विविध घोषणांनी इतवारी परिसर दणाणून गेला. महागाई आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे बडगे समोर येताच ‘घेऊन जा रे मारबत’च्या घोषणांनी वातावरण भारून गेले.
परदेशी पाहुण्यांनी अनुभवला नागपूरचा लोकसोहळा
यंदाच्या मारबत मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीचे. फ्रान्स, इटली, फिनलंड आणि नॉर्वेच्या वाणिज्य राजदूतांनी नेहरू चौकातील इमारतीवरून या अनोख्या लोकपरंपरेचा थरार अनुभवला. शतकाहून अधिक काळ जपल्या गेलेल्या नागपूरच्या या सांस्कृतिक परंपरेचे त्यांनी कौतुक केले.प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, जय मेहता, अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अंकुश चौधरी, तसेच क्रिकेटपटू उमेश यादव यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. रस्त्यांवर उसळलेला नागपूरकरांचा उत्साह पाहून मान्यवरही भारावून गेले.
तब्बल 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त
मिरवणुकीची भव्यता आणि अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः सहकाऱ्यांसह बंदोबस्ताची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त, एसआरपीएफच्या तुकड्या आणि नागपूर महापालिकेच्या नियोजनामुळे मिरवणूक सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडली. मारबतीची तब्बल 150 वर्षांची परंपरा, नागपूरकरांची उत्स्फूर्त लोकसहभागाची भावना आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करण्याची अनोखी शैली यांचा संगम घडविणारा यंदाचा मारबत-बडगा महोत्सव त्यामुळे नागपूरच्या सांस्कृतिक इतिहासातील आणखी एक संस्मरणीय अध्याय ठरला
देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचला सोहळा
स्थानिक वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणामुळे नागपूरच्या या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद देश-विदेशात असलेल्या प्रेक्षकांनाही घेता आला. रस्त्यांवरचा जनसागर, ताशांचा निनाद, गुलालाची उधळण, बडग्यांमधून व्यक्त होणारे उपरोधिक भाष्य आणि काळी-पिवळी मारबतचे पारंपरिक मिलन यामुळे यंदाचा उत्सव विशेष ठरला.मारबत-बडगा हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा नसून नागपूरच्या लोकजीवनाशी जोडलेली सामाजिक अभिव्यक्तीची अनोखी परंपरा आहे. बदलत्या काळानुसार विषय बदलत गेले, बडग्यांचे स्वरूप बदलले; मात्र लोकभावना आणि परंपरेशी असलेली नाळ आजही कायम आहे.
------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी