
रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। माणगाव पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत मुंबई-गोवा महामार्गालगत सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर छापा टाकला. गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास कार्तिक हॉटेलसमोरील एका इमारतीत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ३२ जणांवर कारवाई केली. ऑडी कारसह नऊ वाहने आणि २९ मोबाईल फोन असा तब्बल ७५ लाख ८२ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या अचानक धाडीने घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून, या कारवाईने माणगावातील कथित अवैध जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.
रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, माणगावचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पवार आणि पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कार्तिक हॉटेलसमोरील नारायण शेठ यांच्या मालकीच्या इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली.
गुरुवारी पहाटे पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकताच तेथे उपस्थित असलेल्यांची धावपळ उडाली. पोलिसांनी परिसराची झडती घेत कारवाई पुढे नेली. या छाप्यात मुख्य आरोपी हितेन छेडा याच्यासह एकूण ३२ जणांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी एक ऑडी कार, दोन अर्टिगा कार, दोन मोटारसायकली आणि चार स्कुटी अशी एकूण नऊ वाहने जप्त केली. त्याचबरोबर २९ मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची प्राथमिक किंमत ७५ लाख ८२ हजार २५ रुपये असल्याचे समोर आले आहे. वाहनांची मोठी संख्या आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्याने या कारवाईकडे परिसराचे लक्ष वेधले गेले आहे.
माणगाव शहराच्या मध्यवर्ती भागात कथितपणे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहर व परिसरातील अशा बेकायदा व्यवसायांवर पोलिसांनी सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)