
लातूर, ११ सप्टेंबर (हिं.स.) : अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळी, म्हैस चोरी तसेच घरफोडीच्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून वसूल करण्यात आलेली ४ लाख ६१ हजार ५०० रुपयांची रक्कम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गेल्या चार दिवसांत संबंधित फिर्यादींना परत करण्यात आली. चोरीस गेलेल्या जनावरांच्या किमतीची तसेच घरफोडीतील रोख रकमेची भरपाई मिळाल्याने पीडित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो संबंधित फिर्यादींना परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अहमदपूर पोलिसांनी ही प्रभावी कारवाई केली.
अहमदपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून चोरीस गेलेल्या शेळी व म्हशींची किंमत तसेच रोख रक्कम वसूल करण्यात आली.
यामध्ये गुन्हा क्रमांक १३४/२०२६ मधील फिर्यादी गंगाधर बालाजी भातीकरे, रा. शिरूर ताजबंद यांना चोरीस गेलेल्या शेळीच्या किमतीपोटी १ लाख ४३ हजार रुपये परत करण्यात आले.
गुन्हा क्रमांक ६२/२०२६ मधील फिर्यादी संजय पुंडलिकराव जाधव, रा. मोघा यांना ७० हजार रुपये, तर गुन्हा क्रमांक ५५७/२०२६ मधील फिर्यादी राहुल बेंबडे, रा. काजळहिप्परगा यांना चोरीस गेलेल्या शेळीच्या किमतीपोटी २१ हजार रुपये परत करण्यात आले.
तसेच गुन्हा क्रमांक ४२३/२०२६ मधील फिर्यादी सिराजोदीन रहीमोदीन जागीरदार, रा. हिप्पळगाव यांना चोरीस गेलेल्या म्हशीच्या किमतीपोटी १ लाख ५० हजार रुपये देण्यात आले. गुन्हा क्रमांक ४९६/२०२६, कलम ३३१(४) बीएनएस मधील फिर्यादी विश्वनाथ सुरनर व छायाबाई कलवले, रा. गुगदळ यांच्या घरफोडीच्या गुन्ह्यातील ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून वसूल करण्यात आला.
अशाप्रकारे या पाच गुन्ह्यांमध्ये एकूण ४ लाख ६१ हजार ५०० रुपयांची रक्कम आरोपींकडून वसूल करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गेल्या चार दिवसांत ही रक्कम संबंधित फिर्यादींना रोख स्वरूपात परत करण्यात आली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुद्देमाल लेखपाल तथा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर राठोड आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत आरदवाड यांनी मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल आणि पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांच्या समक्ष संबंधित फिर्यादींना रक्कम व मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
ही प्रक्रिया केवळ या पाच गुन्ह्यांपुरती मर्यादित नसून, चोरीस गेलेला मुद्देमाल किंवा त्याची किंमत आरोपींकडून हस्तगत झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो संबंधित पीडितांना परत करण्याची कार्यवाही पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती अहमदपूर पोलिसांनी दिली.
चोरीच्या गुन्ह्यांचा तपास आणि आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यासोबतच तो संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. अल्पावधीत लाखो रुपयांची रक्कम वसूल करून ती पीडित नागरिकांना परत केल्याबद्दल अहमदपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis