कच्च्या तेलाच्या दरवाढीचा बाजाराला फटका; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उताराचा आज देशांतर्गत शेअर बाजारावर स्पष्ट परिणाम दिसून आला. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. मात्र, सकाळी सुमारे १० व
Stock Market Closing


नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उताराचा आज देशांतर्गत शेअर बाजारावर स्पष्ट परिणाम दिसून आला. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. मात्र, सकाळी सुमारे १० वाजता कच्च्या तेलाचा दर १०८.७७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्यानंतर त्यात काहीशी घट झाली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील घसरणीला काही प्रमाणात लगाम बसला आणि खरेदी वाढल्याने सेन्सेक्स व निफ्टीने नीचांकी पातळीवरून जोरदार सुधारणा केली. मात्र, दिवसअखेरीस पुन्हा विक्रीचा दबाव वाढल्याने दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९३.४३ अंक अर्थात ०.७९ टक्क्यांच्या घसरणीसह ७४, ३०९.१६ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या काही वेळातच विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स ७४२.४३ अंकांनी घसरून ७४,१६०.१६ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने बाजाराने जोरदार सुधारणा केली. दिवसअखेरीस काही वेळ आधी सेन्सेक्स नीचांकी पातळीवरून ७५६.९९ अंकांनी सावरत १४.५६ अंक अर्थात ०.०२ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह ७४,९१७.१५ अंकांवर पोहोचला होता. मात्र, शेवटच्या दहा मिनिटांत पुन्हा विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने सेन्सेक्स १२०.८३ अंक अर्थात ०.१६ टक्क्यांनी घसरून ७४,७८१.७६ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २०७.५० अंक अर्थात ०.८८ टक्क्यांनी घसरून २३,२७०.३० अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात तो २४६.४० अंकांनी घसरून २३,२३१.४० अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात काहीशी घट झाल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीला सुरुवात केली. त्यामुळे निफ्टीने नीचांकी पातळीवरून २१६.७० अंकांची सुधारणा करत २३ हजार ४४८.१० अंकांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र, त्यानंतर पुन्हा विक्री झाल्याने निफ्टी ७९.७० अंक अर्थात ०.३४ टक्क्यांनी घसरून २३,३९८.१० अंकांवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये धातू आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा धातू निर्देशांक २.४० टक्क्यांनी, तर स्थावर मालमत्ता निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक घसरला. वाहन, भांडवली वस्तू, ग्राहक टिकाऊ वस्तू, दैनंदिन वापराच्या वस्तू, आरोग्यसेवा, तेल-वायू आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्येही कमजोरी दिसून आली. दुसरीकडे, बँकिंग आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना खरेदीचा आधार मिळाला. निफ्टी बँकिंग निर्देशांक ०.२४ टक्के आणि माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक ०.११ टक्क्यांनी वाढला.

विस्तृत बाजारपेठेतही विक्रीचा दबाव कायम राहिला. निफ्टी मध्यम आकाराच्या कंपन्यांचा निर्देशांक ०.२६ टक्के, तर छोट्या कंपन्यांचा निर्देशांक ०.५८ टक्क्यांनी घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ३.५१ लाख कोटी रुपयांची घट झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४८१.५६ लाख कोटी रुपयांवर आले. गुरुवारी हे मूल्य ४८५.०७ लाख कोटी रुपये होते.

आजच्या व्यवहारात एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाइफ आणि विप्रो हे प्रमुख वाढणारे समभाग ठरले. तर हिंडाल्को इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, टाटा स्टील आणि ओएनजीसी यांना मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande