शिक्षकांच्या हातूनच ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार - भरत गोगावले
रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक नसून संपूर्ण गावाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आह
Teachers are the ones who shape the future of rural students: Guardian Minister Bharat Gogawale.


रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम शिक्षक करत असतात. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक नसून संपूर्ण गावाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. त्यामुळे शिक्षकांवर मोठी सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरत गोगावले यांनी केले.

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री.गोगावले बोलत होते.

कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विषय समित्यांचे सभापती, सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. गोगावले म्हणाले, सध्या समाज माध्यमांवर ८०च्या दशकातील छायाचित्ररुपी आठवणी जपण्यापेक्षा त्या काळातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खासगी शाळांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांकडे आकर्षित करण्यासाठी शिक्षकांसह सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जिल्ह्यातील उद्योगांनी आपल्या सीएसआर निधीचा उपयोग जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अभ्यास दिनदर्शिकेचे तसेच शिष्यवृत्ती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पालकमंत्री श्री. गोगावले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या १६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande