
रत्नागिरी, 10 सप्टेंबर (हिं.स.) । येथील गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमेश्वर येथील कातळ सड्याला भेट देऊन कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण ‘सडा’ परिसंस्थेचा अभ्यास केला.
महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग विविध शैक्षणिक व पर्यावरणविषयक उपक्रम राबवत असतो. विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक परिसंस्थांविषयी जाणीव निर्माण व्हावी आणि त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून निसर्गाचा अभ्यास करावा, यासाठी विभागामार्फत क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सडा परिसंस्थेचा अभ्यास करण्यात आला. या भेटीदरम्यान पावसाळ्यात बहरणाऱ्या सड्यावरील विविध हंगामी, कंदवर्गीय, औषधी आणि कीटकभक्षी वनस्पतींचे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले.
क्षेत्रभेटीत गुंडण, फोडशी, सीतेची आसवे, मुरडानिया, गवती दवबिंदू, रानहळद, सोनकी आणि मोर खरचुडी यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची नोंद करण्यात आली. तसेच कंदीलपुष्पांच्या वैशिष्ट्यपूर्ण फुलोऱ्याने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच शंखपुष्पी, गुंज, शतावरी आणि काळी मुसळी यांसारख्या औषधी वनस्पतींचेही निरीक्षण करण्यात आले.
विभागातील प्रा. शरद आपटे यांनी विद्यार्थ्यांना सड्यावर आढळणाऱ्या विविध हंगामी वनस्पतींची माहिती दिली. त्यांनी लॅट्राइट परिसंस्थेची वैशिष्ट्ये, हंगामी वनस्पतींची वाढ, सड्यावरील प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वनस्पतींमध्ये आढळणारे अनुकूलन तसेच या वैशिष्ट्यपूर्ण अधिवासाचे पर्यावरणीय महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वनस्पतींचे निरीक्षण करत क्षेत्राधारित अध्ययनाचा आनंद घेतला.
क्षेत्रभेटीचे नियोजन प्रा. परेश गुरव यांनी केले. त्यामध्ये डॉ. विराज चाबके सहभागी झाले होते. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांच्या पुढाकाराने ही क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पार पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी