अनुदानित खतांसोबत लिंकिंगची सक्ती थांबवा- स्वाभिमानी शेतकरी संघटना
सोलापूर, ११ सप्टेंबर (हिं.स.)। पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके होरपळून निघाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत अनुदानित खतांसोबत लिंकिंगची सक्ती करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आह
अनुदानित खतांसोबत लिंकिंगची सक्ती थांबवा- स्वाभिमानी शेतकरी संघटना


सोलापूर, ११ सप्टेंबर (हिं.स.)। पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके होरपळून निघाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत अनुदानित खतांसोबत लिंकिंगची सक्ती करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. लिंकिंग नाकारल्यास खतांची जादा दराने विक्री केली जात असल्याचा दावा करत ही सक्ती तातडीने थांबवावी; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके जळू लागली आहेत. उसाची वाढ खुंटली असून, आगामी काळात पुरेसा पाऊस न झाल्यास फळबागांवरही संकट ओढवण्याची शक्यता आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची म्हणजेच लिंकिंगची सक्ती केली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

लिंकिंग नाकारल्यास खतांसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २६६.५० रुपये प्रतिपोते दर असलेला युरिया ३५० रुपयांना खरेदी करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इतर अनुदानित खतांबाबतही अशाच प्रकारची परिस्थिती असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

खत कंपन्या आणि ठोक विक्रेत्यांकडून लिंकिंगची सक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लिंकिंगला विरोध करणाऱ्या विक्रेत्यांना खतांचा पुरवठा न करण्याची तंबी दिली जात असल्याचे काही खत विक्रेत्यांचे म्हणणे असल्याचे संघटनेने सांगितले.

या प्रश्नाबाबत राज्य सरकारकडे अनेकदा निवेदने देऊनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना अनुदानित खतांसोबत लिंकिंग करून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. ही सक्ती तातडीने थांबवावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande