ब्रिक्स शिखर परिषद : पुतिन-मोदी-जिनफिंग यांचे लक्षवेधी हस्तांदोलन
- जगाला एकजूट आणि परस्पर सहकार्याचा संदेश - भारत-रशिया-चीन समीकरणाकडे जगाचे लक्ष नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) : नवी दिल्लीत सुरू असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ची
ब्रिक्स शिखर परिषदेत मोदी-पुतिन व जिनपिंग यांचे लक्षवेधी हस्तांदोलन


- जगाला एकजूट आणि परस्पर सहकार्याचा संदेश

- भारत-रशिया-चीन समीकरणाकडे जगाचे लक्ष

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) : नवी दिल्लीत सुरू असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे एकत्रित छायाचित्र विशेष चर्चेचा विषय ठरले आहे. तिन्ही नेते एकमेकांचे हात हातात घेताना दिसत असलेले हे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, बदलत्या जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्याला विशेष राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स’वर विविध छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यामध्ये मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासह इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासोबतचे क्षणही आहेत. ब्रिक्सच्या विस्तारित व्यासपीठावर एकत्र आलेल्या प्रमुख नेत्यांची ही उपस्थिती जागतिक दक्षिणेच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतीक मानली जात आहे.

भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या शिखर परिषदेत व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, जागतिक प्रशासनातील सुधारणा आणि ग्लोबल साउथचा आवाज अधिक प्रभावी करण्यासारखे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 11 सदस्यीय ब्रिक्समध्ये जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या प्रतिनिधित्व करते. युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष आणि अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परिषदेकडे विशेष लक्ष लागले आहे.

मोदी-पुतिन भेटीत व्यापार, ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा

शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची 11 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी राजकीय, आर्थिक, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, कौशल्याधारित मनुष्यबळ आणि जनतेमधील संबंध यांसह विविध क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला.भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार आणखी वाढवण्यासाठी 2030 पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवरही चर्चा झाली. पश्चिम आशिया आणि ब्लॅक सी परिसरातील संघर्षांचा सागरी व्यापार आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षेवर होणारा परिणाम यावरही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. पुतिन यांनी मोदींना पुढील भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाला येण्याचे निमंत्रण दिले असून मोदींनी ते स्वीकारले आहे.

शी जिनपिंग तब्बल 7 वर्षांनी भारतात

दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी नवी दिल्लीत दाखल झाले. सात वर्षांनंतरचा त्यांचा हा भारत दौरा आहे. 2020 मधील गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र ऑक्टोबर 2024 मधील सैन्य माघारीच्या करारानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. थेट विमानसेवा, व्यावसायिक व्हिसा आणि आर्थिक संबंधांमध्येही काही प्रमाणात हालचाल वाढली आहे. मात्र सीमेवरील लष्करी तैनाती, अरुणाचल प्रदेशावरील मतभेद आणि व्यापार-सुरक्षेशी संबंधित प्रश्न अद्याप कायम आहेत. मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी), व्यापार, गुंतवणूक, आर्थिक सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधांमधील विश्वास पुनर्स्थापित करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे केवळ भारत-चीन संबंधांच्या दृष्टीनेच नव्हे, तर संपूर्ण आशियाई भू-राजकारणाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

पुतिन-मोदी-शी यांचा एकत्रित क्षण काय सांगतो ?

पुतिन, मोदी आणि शी जिनपिंग हे तीनही नेते जगातील तीन मोठ्या शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. रशियाचे भारताशी दीर्घकालीन धोरणात्मक संबंध आहेत, तर चीन हा भारताचा मोठा व्यापारी भागीदार असून दोन्ही देशांमध्ये सीमा आणि सुरक्षेचे प्रश्नही आहेत. अशा परिस्थितीत या तिन्ही नेत्यांचा ब्रिक्सच्या मंचावर दिसलेला मैत्रीपूर्ण आणि एकजुटीचा क्षण हा निश्चितच लक्षवेधी ठरतो.

मात्र या छायाचित्राचा अर्थ भारत-रशिया-चीन यांची कोणतीही औपचारिक नवी आघाडी निर्माण झाली आहे, असा घेणे योग्य ठरणार नाही. उलट, वेगवेगळ्या हितसंबंध आणि मतभेद असतानाही बहुपक्षीय व्यासपीठावर संवाद, सहकार्य आणि परस्पर समन्वयाची गरज अधोरेखित करणारा हा क्षण म्हणून त्याकडे पाहणे अधिक योग्य ठरेल.

जागतिक पातळीवर युद्धे, व्यापार संघर्ष, ऊर्जा सुरक्षेचे प्रश्न आणि बदलते सामरिक समीकरण यामुळे अस्थिरता वाढत असताना, ब्रिक्स देशांकडून स्वतंत्र आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा आग्रह वाढताना दिसत आहे. त्यामुळे मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हा एकत्रित क्षण केवळ छायाचित्रापुरता मर्यादित न राहता बदलत्या जागतिक राजकारणाचे प्रतीक म्हणूनही पाहिला जात आहे. --------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande