मुंबईत आंदोलन करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका - बावनकुळे
* गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन टाळण्याचे आवाहन * दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार सज्ज नागपूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) : मुंबईतील आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय लक्षात घेता सर्व
बावनकुळे


* गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन टाळण्याचे आवाहन

* दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार सज्ज

नागपूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) : मुंबईतील आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय लक्षात घेता सर्व आंदोलकांनी याची काळजी घ्यावी. राज्यातील सर्व आंदोलकांना माझी विनंती आहे की, सध्या मुंबईत आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यातच मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा देशातील सर्वांत मोठा उत्सव असून, या काळात कोणीही आंदोलन करू नये, असे आवाहन महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

जरांगे आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, ओबीसी असो अथवा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. इतिहासात यापूर्वी न घेतलेले अनेक निर्णय या दोन्ही नेत्यांनी घेतले आहेत. मात्र, त्यांच्यावर करण्यात येणारी टिप्पणी महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य होणारी नाही.

आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला, त्यातील महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत. आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाची परिस्थिती सरकारसाठी सर्वाधिक महत्त्वाची

दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, सध्या कोणाच्या आंदोलनाच्या भूमिकेपेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती सर्वाधिक महत्त्वाची आहे. राज्यातील सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक ठिकाणी पिके करपत आहेत. याबाबत काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून, आज पुन्हा सायंकाळी चार वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल, त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे कसे उभे राहील आणि शेतकरी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मला आणि मुख्य सचिवांना राज्यातील परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची सरकारची भूमिका आहे, असे बावनकुळे म्हणाले.

राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल. येत्या मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि प्रशासनातील संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष पाहणी करणार असून, आपणही काही ठिकाणी भेटी देणार आहोत. त्यानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

ओयो हॉटेल्सवर पोलिसांची कडक नजर

नागपूर शहरातील ओयो हॉटेल्सबाबतही बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, शहरात प्रत्येक दोन हॉटेल्सच्या आसपास ओयोचा बोर्ड दिसत आहे. या हॉटेल्सच्या परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या विषयाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

पोलीस आयुक्तांनी ओयो हॉटेल्ससाठी कडक नियमावली तयार केली आहे. आता अशा हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांची आवश्यक नोंद व रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओयो हॉटेल्सवर पोलिसांची कडक नजर राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नागपूर शहराची सांस्कृतिक व सामाजिक परंपरा बिघडणार नाही, याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही नियमावली करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande