ब्रिक्स शिखर परिषदेत मोदी-जिनफिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा
भारत-चीन संबंधांना धोरणात्मक दिशा देण्यावर भर नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनफिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी भारत-चीन संबंधांना
जिनपींग यांचे भारत मंडपम येथे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी


भारत-चीन संबंधांना धोरणात्मक दिशा देण्यावर भर

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनफिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी भारत-चीन संबंधांना धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पुढे नेण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी एकमेकांच्या सामर्थ्यांचा लाभ घेत सामायिक विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज व्यक्त केली.

शी जिनफिंग सुमारे 7 वर्षांनी भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि जिनफिंग यांच्यात सीमाविषयक प्रश्न, व्यापार तसेच गुंतवणुकीसह विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनफिंग यांचे भारतात स्वागत करताना ब्रिक्स शिखर परिषदेत चीनकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेदरम्यान चीनने दिलेले समर्थन आणि सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मोदी यांनी नमूद केले. तसेच, द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याची ही योग्य संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शी जिनफिंग यांनीही भारतासोबतचे संबंध चीनसाठी धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. भारत भेटीचे निमंत्रण त्यांना 15 जून रोजी, त्यांच्या वाढदिवशी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आतापर्यंत 21 वेळा भेट झाल्याचे सांगत, या भेटींमधून अनेक महत्त्वपूर्ण करार आणि सहमती झाली असून त्यामुळे चीन-भारत संबंध सातत्याने पुढे गेले असल्याचे चिनफिंग यांनी नमूद केले.

दोन्ही देशांच्या राष्ट्रीय परिस्थिती वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकांच्या अनुभवातून आणि सामर्थ्यांतून शिकता येऊ शकते, असे चिनफिंग यांनी सांगितले. परस्परांना सहकार्य करत एकत्रितपणे प्रगती साधता येईल आणि सामायिक विकासाच्या दिशेने पुढे जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या बैठकीकडे भारत-चीन संबंधांमध्ये संवाद आणि सहकार्याला चालना देणारे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande