
दुबई, 12 सप्टेंबर (हिं.स.)२०२६ च्या आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेचा सामना करेल. श्रीलंकेच्या संघाने २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती आणि आता ते सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असतील.
महिला टी२० आशिया कपबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत दोन अंतिम सामने खेळले गेले आहेत. या दोन संघांमधील पहिला टी२० आशिया कप अंतिम सामना २०२२ मध्ये खेळला गेला होता, ज्यात भारतीय संघाने श्रीलंकेला आठ गडी राखून पराभूत करून विजय मिळवला होता. यानंतर, या दोन संघांमधील दुसरा सलग टी२० आशिया कप अंतिम सामना २०२४ मध्ये खेळला गेला, ज्यात श्रीलंकेने भारताला पराभूत करून पहिल्यांदाच टी२० आशिया कपचे विजेतेपद पटकावले. आता, भारत आणि श्रीलंका सलग तिसऱ्यांदा आशिया कपच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
२०२६ च्या टी-२० आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले असून, प्रत्येकाने एकदा विजय मिळवला आहे. याशिवाय, आशिया कपच्या एकदिवसीय प्रकारातही हे दोन्ही संघ चार वेळा अंतिम सामन्यात आमनेसामने आले असून, चारही सामने भारताने जिंकले आहेत. परिणामी, सहापैकी पाच अंतिम सामने भारताने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने एक, ज्यामुळे भारताचे पारडे जड आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे