तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासाठी ऋतब्रत गटाचा दावा; आयोगासमोर मांडली बाजू
कोलकाता, 12 सप्टेंबर (हिं.स.)। तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर अधिकार मिळवण्यावरून सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. शनिवारी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने आयोगासोबत सुमारे एक तास २० मिनिटे बैठक घेतली. बैठकीनंतर ऋत
WB TMC SYMBOL ECI Ritabrata faction


कोलकाता, 12 सप्टेंबर (हिं.स.)। तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर अधिकार मिळवण्यावरून सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. शनिवारी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने आयोगासोबत सुमारे एक तास २० मिनिटे बैठक घेतली. बैठकीनंतर ऋतब्रत यांनी दावा केला की, आयोगाकडून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून मागवण्यात आलेली कागदपत्रेही जमा करण्यात आली आहेत. तृणमूल काँग्रेसचे निवडणूक चिन्ह मिळवण्याबाबत त्यांचा गट पूर्णपणे आश्वस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

‘खऱ्या’ तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या ऋतब्रत गटाच्या वतीने ऋतब्रत बॅनर्जी यांच्यासोबत अरूप राय, चंद्रिमा भट्टाचार्य, अखरुज्जमान आणि अधिवक्ता अमन झा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ऋतब्रत यांनी सांगितले की, आयोगासमोर त्यांनी तथ्ये आणि कागदपत्रांच्या आधारे आपली बाजू मांडली आहे. केवळ मनगटदाबीचे दावे करण्यात आलेले नाहीत, तर आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

बैठकीनंतर ऋतब्रत यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, तृणमूल काँग्रेसमध्ये आता ‘न खाता, न बही, जो डॉक्टर ममता बनर्जी कहें वही सही’ अशी व्यवस्था चालणार नाही. पक्षात एखाद्या एका व्यक्तीच्या इच्छेनुसार निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत आणि मनमानी निर्णय लादले जाऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले.

ऋतब्रत यांनी म्हटले, “तृणमूल काँग्रेस हा कोणत्याही कुटुंबाचा पक्ष नाही. तृणमूल काँग्रेस कोणाचीही खासगी मालमत्ता नाही. हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.” विशेष म्हणजे, ऋतब्रत ममता बॅनर्जी यांच्यावर तीव्र टीका करत असताना त्यांच्या सोबत चंद्रिमा भट्टाचार्य, अरूप राय आणि अखरुज्जमान यांच्यासारखे ममता यांचे जुने समर्थकही उपस्थित होते. ऋतब्रत यांनी सांगितले की, आयोगासमोर आपल्या गटाची बाजू मांडण्यासोबतच लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे. मात्र आयोग आपला निर्णय नेमका कधी देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

उल्लेखनीय म्हणजे, पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे. दोन्ही गटांना त्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाचा निकाल लागावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत कोणताही संभ्रम राहू नये, अशी दोन्ही गटांची इच्छा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande