
सना, 12 सप्टेंबर (हिं.स.)। यमनमध्ये सौदी अरेबिया विरोधातील लष्करी तणाव वाढत आहे. यमन सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरी यांनी दावा केला आहे की, सैन्याने हुडैदाह आणि ताइझ प्रांतांमध्ये सुमारे ५ हजार ४०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला असून, शेकडो सौदी समर्थित लढवय्यांना ठार किंवा जखमी केले आहे. प्रवक्त्यांनी बाब अल-मंदाबच्या दिशेने आगेकूच करण्यासह सौदीच्या ठिकाणांवरील हल्ले तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
इराण सरकारच्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी दूरदर्शनवरून दिलेल्या निवेदनात सरी यांनी सांगितले की, यमनी सैन्य आणि ‘पॉप्युलर कमिटीज’शी संबंधित लढवय्यांनी दोन्ही प्रांतांमधील सहा जिल्ह्यांतून सौदी समर्थित सैन्याला हुसकावून लावले. या मोहिमेदरम्यान सौदी समर्थित लढवय्यांच्या सात डिव्हिजन आणि ३८ ब्रिगेडचा पराभव केल्याचा त्यांनी दावा केला.
सरी यांच्या म्हणण्यानुसार, या लढाईत शेकडो लढवय्ये ठार किंवा जखमी झाले, तर अनेकांना ताब्यात घेण्यात आले. सौदी समर्थित सैन्याने चालवलेल्या ताबा केंद्रांमध्ये ठेवण्यात आलेल्या अनेक कैद्यांचीही लष्करी दलाने सुटका केल्याचा त्यांनी दावा केला. यमन सैन्याच्या प्रवक्त्याने दावा केला की, त्यांच्या हवाई संरक्षण पथकांनी ३२ मोहिमा राबवल्या आणि सौदी विमानांची घुसखोरी रोखताना नऊ विमाने पाडली. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे तातडीने पुष्टी झाल्याचे वृत्त नाही.
सरी यांनी सांगितले की, लाल समुद्रातील जहाजांच्या वाहतुकीबाबत यमन सैन्य आपल्या जाहीर केलेल्या धोरणावर ठाम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सौदी अरेबियातून येणारी जहाजे वगळता इतर जहाजांना लाल समुद्रातून जाण्याची परवानगी असेल. त्यांनी याला “नाकेबंदीच्या बदल्यात नाकेबंदी” असे धोरण संबोधत सांगितले की, जोपर्यंत यमनविरोधातील लष्करी कारवाई आणि नाकेबंदी सुरू राहील, तोपर्यंत सौदीच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले जात राहील.
यमनमधील संघर्ष २०१५ मध्ये त्यावेळी तीव्र झाला, जेव्हा सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने यमन सरकारच्या समर्थनार्थ लष्करी कारवाई सुरू केली. या संघर्षात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला असून, देशाला गंभीर मानवतावादी संकटाचा सामना करावा लागला आहे. यमन सैन्याच्या ताज्या दाव्यांदरम्यान या भागातील तणाव वाढण्याची शक्यता कायम आहे. हुडैदाह आणि बाब अल-मंदाब सामुद्रधुनीचा परिसर धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, लाल समुद्राच्या माध्यमातून हा आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराच्या प्रमुख मार्गांपैकी एक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule