
तब्बल १४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित; ६३ शाळा प्रभावित
काठमांडू, १२ सप्टेंबर (हिं.स.)। नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुराचा आणि भूस्खलनाचा मोठा फटका रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांतील शिक्षण व्यवस्थेला बसला आहे. या तीन जिल्ह्यांमधील तब्बल १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित झाले असून, एकूण ६३ शाळा प्रभावित झाल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.
पुरानंतर अद्याप ३९६ विद्यार्थी आणि २१ शिक्षक बेपत्ता आहेत. तर २० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचे मृतदेह सापडले आहेत. शिक्षण मंत्रालयाने घटनास्थळी केलेल्या पाहणीच्या आधारे शैक्षणिक नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. प्रभावित ६३ शाळांमध्ये ५० सामुदायिक, ११ खासगी आणि दोन धार्मिक शाळांचा समावेश आहे. यापैकी १२ शैक्षणिक संस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, ११ शाळांचे अंशतः नुकसान झाले आहे. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या शाळांमध्ये आठ सामुदायिक, तीन खासगी आणि एका धार्मिक शाळेचा समावेश आहे.
याशिवाय २५ शाळांचा वापर ‘होल्डिंग सेंटर’ म्हणून केला जात आहे. या ठिकाणी सुमारे २ हजार २७० विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये सध्या नियमित वर्ग सुरू करणे शक्य झालेले नाही. आणखी १५ शाळांच्या इमारतींचे थेट नुकसान झालेले नसले, तरी मानवी जीवितहानी आणि अन्य परिस्थितींमुळे तेथेही शैक्षणिक उपक्रम सुरू झालेले नाहीत.शिक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते श्रीप्रसाद भट्टराई यांनी सांगितले की, पूर आणि भूस्खलनामुळे २३ शैक्षणिक संस्थांचे नुकसान झाले असून, २५ शाळांचा वापर विस्थापित नागरिकांसाठी आश्रयस्थळ म्हणून केला जात आहे. विस्थापित नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधला जात आहे.
नुवाकोटमध्ये सर्वाधिक परिणाम
या तीन जिल्ह्यांमध्ये नुवाकोटमध्ये सर्वाधिक शैक्षणिक नुकसान झाले आहे. येथे ११ शाळांचे नुकसान झाले असून १६ शाळांचा वापर ‘होल्डिंग सेंटर’ म्हणून केला जात आहे. आणखी एका शाळेच्या इमारतीचे नुकसान झालेले नसले, तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे तेथे वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत. नुवाकोटमध्ये एकूण ६ हजार ३१५ विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित झाले आहे.
धादिंगमध्ये ५ हजारांहून अधिक विद्यार्थी बाधित
धादिंगमध्ये आठ शाळांचे पुरामुळे नुकसान झाले आहे, तर दोन शाळांचा वापर ‘होल्डिंग सेंटर’ म्हणून केला जात आहे. आणखी चार शाळा शिक्षण सुरू करण्यासाठी सज्ज असल्या तरी विद्यार्थी शाळेत पोहोचत नसल्याने वर्ग सुरू झालेले नाहीत. या जिल्ह्यात ५ हजार ६६ विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित झाले आहे.
रसुवामध्येही शैक्षणिक संकट
रसुवा जिल्ह्यात चार शाळांचे पुरामुळे नुकसान झाले आहे, तर सात शाळांमध्ये विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. याशिवाय आणखी १० शाळांमध्ये विद्यार्थी पोहोचत नसल्याने शैक्षणिक कामकाज ठप्प आहे. रसुवामध्ये एकूण ३ हजार ७४ विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित झाले आहे. पुरामुळे झालेल्या या विध्वंसानंतर तीनही जिल्ह्यांमधील शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणणे हे मोठे आव्हान ठरले आहे. शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, विस्थापित कुटुंबांचे पुनर्वसन तसेच बेपत्ता विद्यार्थी आणि शिक्षकांचा शोध घेणे या बाबींना सध्या प्राधान्य देण्यात येत आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule