
बीड, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
: केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्यासह नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्याविरोधात फेसबुकवर कथित आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मुंदडा समर्थकांनी यासाठी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मोहन कुलकर्णी (अंबाजोगाई) असे गुन्हा नोंद झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी यांनी १० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे फेसबुकवर आमदार नमिता मुंदडा यांच्याबाबत पोस्ट केली. या पोस्टमध्ये नगर परिषद नेमणुकीच्या संदर्भात मदत करणाऱ्या व्यक्तींना कथितरीत्या अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अंबाजोगाईसाठी भाजप सरकारकडून मिळालेल्या निधीबाबत, आमदारांच्या निकटवर्तीयांबाबत तसेच शहरातील कथित अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीबाबतही गंभीर आरोप करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या पोस्टमुळे आमदार नमिता मुंदडा यांची बदनामी होऊन त्यांच्या लौकिकास जाणीवपूर्वक बाधा निर्माण करण्यात आल्याचा आरोप भगवान केदार यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून पोस्टची सत्यता, तिचा प्रसार तसेच त्यातील आरोपांबाबत चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis