यवतमाळ : पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही
यवतमाळ, १४ सप्टेंबर (हिं.स.) : तांत्रिक अडचणींच्या कचाट्यात अडकलेला पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. विमा दावे निकाली काढण्यात येतील, तांत्रिक त्रुटी दूर केल्या जातील, अशी आश्वासने देऊन बराच कालावधी उलटला आहे. मात्र, प्रत्य
शेतकर्!यांसाठी आश्वासनांचा पाऊस, मदतीचा दुष्काळ


यवतमाळ, १४ सप्टेंबर (हिं.स.) : तांत्रिक अडचणींच्या कचाट्यात अडकलेला पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. विमा दावे निकाली काढण्यात येतील, तांत्रिक त्रुटी दूर केल्या जातील, अशी आश्वासने देऊन बराच कालावधी उलटला आहे. मात्र, प्रत्यक्षात विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांसाठी पीक विमा संरक्षणाऐवजी केवळ कागदी प्रक्रिया ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

२०२५-२६च्या हंगामातील पीक विम्यापासून घाटंजी तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्याप वंचित आहेत. विमा दाव्यांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण देण्यात आले असून, त्या दूर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जाईल, असे शासन आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, या तांत्रिक अडचणी दूर करण्याची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत पोहोचली, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.

पीक विम्याचा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला आहे.

आर्णी-केळापूर मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रलंबित विमा दाव्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे रखडलेली प्रकरणे मार्गी लागतील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, पाठपुरावा होऊनही घाटंजी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यासह यवतमाळच्या वणी तालुक्यात तांत्रिक कारणांमुळे नाकारलेल्या पीक विमा दाव्यांची नव्याने समीक्षा करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे प्रलंबित दाव्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, या आदेशानंतर प्रत्यक्षात कोणती कार्यवाही झाली, याबाबत शेतकऱ्यांना अद्याप माहिती मिळालेली नाही.

‘घाटंजीवर सातत्याने अन्याय’

“पीक विम्याच्या बाबतीत घाटंजी तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची दप्तर दिरंगाई याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्याच्या इतर भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत असताना घाटंजी तालुका त्यापासून वंचित राहणे अतिशय दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते मोरेश्वर वातिले यांनी व्यक्त केली.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande