
रायगड, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेशोत्सवातील समृद्ध कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारत आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेत ‘जागतिक सर्वोत्तम रील’साठी १ लाख रुपये, तर महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. ही स्पर्धा नैवेद्य आणि परंपरा, गणराज रंगी (सादरीकरण कला), कलाधिपती गणपती (दृश्यकला), शब्दसुमनांकित गणराय (साहित्यकला) आणि AI मधून गणपतीचे नवदर्शन अशा पाच विविध श्रेणींमध्ये घेतली जाणार आहे. प्रत्येक विभागासाठी प्रथम २५ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय १० हजार आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केवळ पाचव्या श्रेणीतच ग्राह्य धरला जाईल, तर इतर चार विभागांमध्ये AI चा वापर करण्यास बंदी आहे.
स्पर्धेसाठी सादर केली जाणारी रील उभी (9:16) स्वरूपातील व किमान ३० ते कमाल ९० सेकंदांची असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी ही रील स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम किंवा फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून फिल्मसिटी मुंबईच्या अधिकृत खात्याला Collab अथवा Tag करणे बंधनकारक आहे. एका स्पर्धकाला एकाच श्रेणीत सहभाग नोंदवता येईल. या स्पर्धेच्या सविस्तर नियमावलीसाठी आणि अधिकृत नोंदणीसाठी स्पर्धकांनी filmcityganeshareel.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महामंडळाच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)