हत्तीच्या शोधात सापडले गणरायाचे रूप..!
आलापल्लीच्या घनदाट जंगलातील ‘पातानील गणेश’ नवसाला पावणारा गणपती गडचिरोली, १४ सप्टेंबर (हिं.स.) : किर्र जंगलाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या घनदाट सागवान आणि बांबूच्या रांजीत वसलेला ‘पातानील गणेश’ आज भक्तांच्या
किर्र जंगलात असलेला हाच तो पातानील गणपती बाप्पा


आलापल्लीच्या घनदाट जंगलातील ‘पातानील गणेश’ नवसाला पावणारा गणपती

गडचिरोली, १४ सप्टेंबर (हिं.स.) :

किर्र जंगलाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या घनदाट सागवान आणि बांबूच्या रांजीत वसलेला ‘पातानील गणेश’ आज भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनला आहे. अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा मार्गावर आलापल्लीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गणरायाची ख्याती ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी सर्वदूर पसरली आहे. मात्र, या मंदिराच्या स्थापनेमागील कहाणी अत्यंत अनोखी असून ती निसर्गाच्या चमत्काराशी जोडलेली आहे.

हत्ती बेपत्ता अन् सापडले गणरायाचे रूप

अहेरी परिसरातील सागवान लाकडांची तोडणी आणि वाहतुकीसाठी १९८०च्या दशकात हत्तींचा वापर केला जात असे. वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या चार हत्तींपैकी एक हत्ती अचानक घनदाट जंगलात बेपत्ता झाला. सलग दोन दिवस शोध घेऊनही त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

अखेर हताश झालेल्या वनकर्मचाऱ्यांनी आणि मजुरांनी श्री गणेशाला साकडे घातले. “हत्ती सापडू दे, ११ पोती नारळ फोडू,” असा नवस त्यांनी केला. साकडे घातल्यानंतर काही क्षणांतच जंगलात हरवलेल्या हत्तीची किंकाळी ऐकू आली. मजूर आवाजाच्या दिशेने धावले असता हत्तीच्या गळ्यातील साखळदंड एका दगडात अडकलेला दिसला.

तो दगड बाहेर काढला असता त्यावर चक्क श्री गणेशाचे सुंदर रूप कोरलेले आढळले. वन विभागावरील संकट दूर झाल्याच्या आनंदात कर्मचाऱ्यांनी आणि मजुरांनी ही मूर्ती स्वच्छ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून हा गणपती परिसरातील भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान बनला.

सुविधांचे विघ्न दूर करण्याची भाविकांची मागणी

आज ‘पातानील गणपती’ परिसरातील मजूर आणि भाविकांचा प्रमुख श्रद्धास्थंभ बनला आहे. मजुरांनी लावलेल्या झाडाभोवती आता चबुतरा बांधण्यात आला असून, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र, हे मंदिर वन विभागाच्या हद्दीत असल्याने इतर शासकीय विभागांकडून निधी मिळविण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात जंगली श्वापदांच्या भीतीमुळे मंदिरापर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्यातच भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

आजही मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे अथांग जंगलातील या श्रद्धास्थळापर्यंत जाणाऱ्या भक्तांचे आणि रस्त्याचे विघ्न आता या विघ्नहर्त्यानेच दूर करावे, अशी आर्त हाक भाविकांकडून दिली जात आहे.----------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande