
जिल्ह्यात १५०९, तर शहरात ६०० हून अधिक गणेश मंडळे सज्ज
गणेशोत्सवासाठी तब्बल साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त
अमरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) :
गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणेशोत्सवाला आज, सोमवार १४ सप्टेंबरपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. घरोघरी विधिवत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेदेखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. अमरावती जिल्ह्यात तब्बल १५०९, तर शहरात ६०० हून अधिक गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरात सुमारे १९००, तर ग्रामीण भागात २६४४ अशा एकूण साडेचार हजारांहून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून अमरावती शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाची घरोघरी स्थापना केली. पुढील बारा दिवस शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
नेहरू मैदानावर मातीच्या मूर्तींची बाजारपेठ
अमरावती शहरातील नेहरू मैदान परिसरात मातीच्या गणेशमूर्तींची विशेष बाजारपेठ सजली आहे. गणेश स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासूनच या बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विविध आकार, रूप आणि आकर्षक सजावटीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पसंती
यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि शाळांच्या वतीने शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांमुळे भाविकांमध्येही जागरूकता निर्माण झाली असून, मातीच्या आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी