
कृत्रिम फुलांच्या विक्रीकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष
अमरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) :
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची लगबग वाढली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकरिता सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, विविध प्रकारच्या आकर्षक सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी आहे.
गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी विविध आकारांचे आणि आकर्षक डिझाइनचे मखर, रंगीबेरंगी फुले, हार, तोरणे तसेच विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी नागरिक आपल्या आवडीनुसार साहित्याची खरेदी करत आहेत. विशेषतः रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि आकर्षक मखरांकडे भाविकांचा अधिक कल दिसून येत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्लास्टिकच्या फुलांचा अडथळा
एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत असताना, दुसरीकडे प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांवर बंदी असतानाही बाजारपेठेत आर्टिफिशियल प्लास्टिकची फुले आणि हार विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला काही प्रमाणात हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीवर ताण
गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत असल्याने प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. परिणामी, बाजारपेठ परिसरातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेता पोलिस आणि प्रशासनाने वाहतूक व गर्दीचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी