
नियमांचे उल्लंघन; मंडळ पदाधिकारी व बँजो मालकावर कारवाईअमरावती, 14 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राजापेठ पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गणपती स्थापना सोहळ्यादरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या बँजोवर कारवाई करत पोलिसांनी तो जप्त केला. या कारवाईमुळे गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रवी नगर परिसरात माऊली गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणपती स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान जगदीश धुमाळ, रा. भंडारा, यांच्या मालकीचा ‘चार बेस, दोन टॉप’ असा बँजो मोठ्या आवाजात वाजविण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या बँजोमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याचे आढळून आले. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजापेठ पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी संबंधित बँजो ताब्यात घेत जप्त केला असून तो राजापेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
या प्रकरणी संबंधित माऊली गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच बँजो मालक जगदीश धुमाळ यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, आगामी गणेशोत्सव काळात परवानगीपेक्षा अधिक आवाजात ध्वनिक्षेपक, बँजो अथवा अन्य वाद्ये वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना ध्वनी मर्यादा आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी