
भारत-चीन संबंध सुधारण्याचे संकेत
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.) । चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपल्या सैनिकांच्या तैनातीत मोठी घट केली आहे. त्यामुळे भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा आणि सीमावर्ती भागात स्थैर्य निर्माण होण्याचे संकेत मिळत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये भारताच्या उत्तरेकडील सीमेसमोर चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (पीएलए) तैनातीत लक्षणीय घट झाली. एलएसी लगतच्या भागांमध्ये तसेच पारंपरिक प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये कंबाइंड आर्म्स ब्रिगेडच्या आकाराच्या सुमारे 10 तुकड्या तैनात राहिल्या. दरम्यान, एलएसीच्या सर्व सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची तैनाती मजबूत आणि योग्य स्थितीत ठेवण्यात आली असून, कोणत्याही अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.चिनी सैन्याच्या तैनातीत झालेली ही घट भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या राजकीय, राजनैतिक आणि लष्करी संपर्काच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. या घडामोडींमुळे उत्तरेकडील सीमांवर अधिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत झाली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले.
भारत-चीन संवादाला पुन्हा गती
भारत आणि चीनने 2025 मध्ये द्विपक्षीय चर्चेचे विविध मार्ग पुन्हा सक्रिय केले. वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशनची (डब्ल्यूएमसीसी) 33वी आणि 34वी बैठक अनुक्रमे मार्च आणि जुलै 2025 मध्ये झाली होती.सीमा विवादावर विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेलाही पुन्हा सुरुवात झाली. या चर्चेच्या फेऱ्या डिसेंबर 2024 आणि ऑगस्ट 2025 मध्ये पार पडल्या.ऑगस्ट 2025 मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियानजिन येथे चीनचा दौरा केला. या भेटीमुळे भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा होण्याच्या प्रक्रियेला आणखी बळ मिळाले, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.लष्करी पातळीवरही दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू असून, 25-26 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्व लडाखमध्ये झालेली 23वी कोअर कमांडर स्तरावरील बैठक त्याचाच एक भाग होती.
सीमावर्ती बैठकांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सीमावर्ती भागातील चिंता आणि प्रलंबित मुद्दे सोडवण्यासाठी पीएलएसोबत सर्व सेक्टरमध्ये बॉर्डर पर्सनल मीटिंग्स (बीपीएम) नियमितपणे घेतल्या जात आहेत. या बैठका सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणात सुरू असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.विवादित सीमेवर अनेक वर्षे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या ताज्या घडामोडींमुळे भारत-चीन संबंधांमध्ये स्थैर्याचे संकेत मिळत आहेत.
मोदी-शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर 50 मिनिटांहून अधिक काळ द्विपक्षीय चर्चा झाली.शी जिनपिंग यांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशांना द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे सांगितले.शी जिनपिंग यांनी चीन भारत-चीन संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहत असल्याचे सांगितले.
तसेच दोन्ही देशांनी सामायिक विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.तसेच जटिल आंतरराष्ट्रीय वातावरणात अनेक प्रकारची आव्हाने आणि बदल होत असताना, जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आणि ग्लोबल साउथचे महत्त्वाचे सदस्य म्हणून चीन आणि भारतावर मोठ्या जबाबदाऱ्या असल्याचे शी जिनपिंग यांनी सांगितले.--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी