
भाजपने 309 पैकी 163 जागांवर मारली बाजी
जयपूर, 14 सप्टेंबर (हिं.स.) : राजस्थानमधील नगर निकाय निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवला आहे. जाहीर झालेल्या 309 जागांच्या निकालांमध्ये भाजपने 163 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला 103 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष उमेदवारांनी 43 जागांवर बाजी मारली आहे.
या निवडणुकीत तब्बल 38,889 उमेदवार रिंगणात होते. राज्यातील 10 महानगरपालिका, 47 नगरपरिषदा आणि 252 नगरपालिकांमध्ये नवीन सत्ताधारी मंडळे स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय चित्र
महानगरपालिका (10) : भाजप 5 ठिकाणी, काँग्रेस 4 ठिकाणी आघाडीवर असून एका ठिकाणी इतर पक्ष आघाडीवर आहेत.
नगरपरिषदा (47) : भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 15 ठिकाणी आघाडीवर आहेत. इतर पक्ष 5 ठिकाणी आघाडीवर असून 2 ठिकाणी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. तर 10 ठिकाणचे निकाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.
नगरपालिका (252) : भाजप 76, काँग्रेस 49 आणि इतर पक्ष 11 ठिकाणी आघाडीवर आहेत. 13 ठिकाणी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, तर 103 ठिकाणचे निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
प्रमुख शहरांमध्ये भाजपची आघाडी
राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असतानाच प्रमुख शहरांमधून भाजपसाठी चांगली बातमी समोर आली आहे.
अजमेर महानगरपालिकेत भाजपने 9 प्रभागांमध्ये विजय मिळवला असून काँग्रेसने 6 प्रभाग जिंकले आहेत.
भीलवाडा महानगरपालिकेत भाजपने 10 प्रभागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला 2 प्रभागांमध्ये यश मिळाले.
जयपूर महानगरपालिकेत भाजपने 17 प्रभागांमध्ये विजय मिळवला असून काँग्रेसने 6 प्रभाग जिंकले आहेत.
वसुंधरा राजे यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे वर्चस्व
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या झालावाड नगरपरिषदेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. एकूण 45 प्रभागांपैकी काँग्रेसने तब्बल 29 प्रभागांमध्ये विजय मिळवला. भाजपला 13 जागा मिळाल्या, तर 2 अपक्ष आणि आम आदमी पक्षाच्या (आप) एका उमेदवारानेही विजय मिळवला.
निवडणुकीत 73.56 टक्के मतदान
राजस्थानमधील नगर निकाय निवडणुका 9 आणि 11 सप्टेंबर रोजी दोन टप्प्यांत पार पडल्या. दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी संपूर्ण राज्यात एकाच वेळी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण 73.56 टक्के मतदान झाले. मागील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान तीन टक्क्यांहून अधिक आहे.प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबतच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत रिंगणात होते.
भाजपने 9,290 उमेदवार मैदानात उतरवले होते, तर काँग्रेसने 9,027 जणांना उमेदवारी दिली. अपक्ष उमेदवारांची संख्या तब्बल 18,732 होती. याशिवाय राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी)चे 948, आम आदमी पक्षाचे 311, बहुजन समाज पक्षाचे (बसपा) 298, सीपीआय (एम)चे 185 आणि भारत आदिवासी पक्षाचे (बीएपी) 98 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
भाजप आणि काँग्रेससाठी निवडणूक महत्त्वाची
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारसाठी या निवडणुकीचे निकाल विशेष महत्त्वाचे मानले जात आहेत. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवल्यानंतर शहरी राजस्थानमध्ये आपली राजकीय पकड अधिक मजबूत करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही राज्यातील आपला संघटनात्मक पाया मजबूत असल्याचे दाखवून देण्याची संधी काँग्रेसला या निवडणुकीत मिळाली होती.या निकालांमुळे राजस्थानच्या शहरी भागातील मतदारांचा कल तसेच प्रभाग पातळीवर भाजप आणि काँग्रेसची ताकद याबाबत प्राथमिक चित्र स्पष्ट झाले आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी