
अमरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) : धामणगावरेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी नागरिक आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, त्यासोबत ग्रामसभेचा ठरावही जोडण्यात आला आहे.
निवेदनानुसार, तळेगाव दशासर हे धामणगावरेल्वे तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक असून, येथे शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, अंगणवाड्या तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हायवेमुळे गावाला चांगली जोडणी मिळाली असून, अमरावती जिल्ह्यातील प्रमुख मार्गही तळेगाव दशासरमधून जातात. समृद्धी महामार्गही गावाजवळून गेला आहे.
तळेगाव दशासरला ऐतिहासिक वारसा लाभला असून, गावात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटाचे आयोजन केले जाते. तसेच विविध धार्मिक स्थळांमुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही वर्दळ असते. त्यामुळे गावाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, वाढती लोकसंख्या आणि गावाचे वाढते महत्त्व लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारा विकास अपुरा पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यास गावाच्या विकासाला गती मिळेल, विविध पायाभूत सुविधा निर्माण करता येतील तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामसभेचा एकमताने ठराव
तळेगाव दशासरचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होऊन गावाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक आणि ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. यासाठी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी