
लातूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक प्रतिभावान, हुशार आणि गरजू विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थिती तसेच योग्य मार्गदर्शनाअभावी नवोदय, शिष्यवृत्ती तसेच राष्ट्रीय स्तरावरील जेईई व नीट सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहत आहेत. ग्रामीण भागातील या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपजत बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी विशेष पावले उचलणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘सुपर हंड्रेड (Super Hundred)’ हा विशेष उपक्रम तातडीने राबविण्यात यावा, अशी मागणी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व पालकांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील गरीब, शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेऊन विशेष निवड करण्यात यावी. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच भविष्यात जेईई वनीट परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांमार्फत विशेष वर्ग घेण्यात यावेत.
तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास साहित्य, पुस्तके उपलब्ध करून देण्याबरोबरच शक्य त्या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्थाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये समान संधी मिळावी, यासाठी ‘सुपर हंड्रेड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची लातूर जिल्ह्यात त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषदेला शिफारस करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. ही मागणी प्रदेश कार्याध्यक्ष धनंजय उजनकर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा सचिव मंचक रंडाळे, उपाध्यक्ष प्रभाकर जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis