राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी पाठपुरावा
गुरुदेव भक्तांची आमदार वानखडे यांच्याकडे मागणी अमरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुदेव भक्तांच्या शिष्टमंडळाने आमदार राजेश वानखडे यांची भेट घेऊन मागणीच
भारतरत्नासाठी गुरुदेव भक्तांचे आमदारांना साकडे


गुरुदेव भक्तांची आमदार वानखडे यांच्याकडे मागणी

अमरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुदेव भक्तांच्या शिष्टमंडळाने आमदार राजेश वानखडे यांची भेट घेऊन मागणीचा प्रभावी पाठपुरावा करण्याचे साकडे घातले. यावेळी राष्ट्रसंतांच्या विचारांचा अमर ठेवा असलेला ‘ग्रामगीता’ ग्रंथ आमदार वानखडे यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

क्रांतिदिनी 9 ऑगस्ट रोजी क्रांतिज्वाला प्रज्वलित करून तिवसा तहसील कार्यालयासमोर मुकुंद पुनसे यांच्या नेतृत्वाखाली गुरुदेव भक्तांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. रमेश बोके, जयकुमार बोके, हैबतराव गाडगे, मनोहर साबळे, जगन साबळे, शफीक शेख यांच्यासह असंख्य गुरुदेव भक्त या आंदोलनात सहभागी झाले होते. पाच दिवस चाललेल्या या आंदोलनाची दखल महाराष्ट्रभर घेण्यात आली होती. आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचली होती.

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाली. मागणीच्या पाठपुराव्याबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

दरम्यान, तिवसा-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ मिळवून देण्यासाठी ही मागणी दिल्ली दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी केंद्रीय शिष्टमंडळाकडे ही मागणी प्रभावीपणे मांडल्याचे गुरुदेव भक्तांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर गुरुदेव भक्तांच्या शिष्टमंडळाने आमदार वानखडे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मागणीचा भविष्यात अधिक तीव्रतेने पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे अधिकृत शिफारस पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

आमदार वानखडे यांनी लवकरच गुरुदेव भक्तांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले. ‘भारतरत्न’ आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रभावी शिफारस करावी, यासाठी महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन मागणीचे साकडे घालण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. यावेळी राम-कृष्ण-हरी विश्वमानव मंदिर, दासटेकडीचे अध्यक्ष विलास महाराज साबळे, आजीवन प्रचारक संघटक प्रल्हाद पारिसे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे, जयकुमार बोके, नरेश भोयर, हैबतराव गाडगे, दिलीप कांडकार, सुधीर लवणकर, नितीन कुबडे, संदीप थोटे यांच्यासह गुरुदेव भक्त उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande