
अमरावती, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाला सुरुवात झाली असताना धारणी शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद असल्याने शहर अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. नगरपंचायतची निवडणूक होऊन जवळपास सात महिने उलटूनही शहरातील पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत तसेच नवीन पथदिवे लावण्याबाबत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मागील रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर काही मुस्लिमबहूल प्रभागांमध्ये पथदिवे लावण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपचे नगरसेवक असलेल्या काही प्रभागांमध्ये अद्यापही पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष भाजपचे आहेत. मात्र त्यांच्याच प्रभागामध्ये पथदिव्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरातील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळे, भाविक आणि नागरिकांची रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वर्दळ राहणार आहे. अशा परिस्थितीत शहरातील रस्ते अंधारात राहिल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, स्थानिक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन काही ठिकाणी स्वखर्चाने पथदिवे लावल्याचे सांगण्यात येते. मात्र, संपूर्ण शहरातील पथदिव्यांची व्यवस्था ही नगरपंचायतची जबाबदारी असताना प्रशासनाकडून अद्याप व्यापक स्वरूपात कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
पथदिवे लावण्याच्या कामात काही प्रभागांना प्राधान्य आणि काही प्रभागांकडे दुर्लक्ष होत असल्याने नगरपंचायतच्या कारभारात दुजाभाव केला जात असल्याची चर्चा स्थानिक जनतेमध्ये आहे. गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने तातडीने शहरातील बंद पथदिव्यांची पाहणी करून दुरुस्ती करावी, तसेच आवश्यक त्याठिकाणी नवीन पथदिवे लावून संपूर्ण शहर प्रकाशमान करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्वखर्चाने वॉर्डात लावले पथदिवे पथदिवे लावण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र, वारंवार मागणी करूनही नगरपंचायतकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन स्वखर्चाने प्रभागात पथदिवे लावले आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे नगरसेविका संगीता मानेकर व नगरसेवक उत्तम मोडक यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी