
रत्नागिरी, 14 सप्टेंबर (हिं.स.) । समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, रोजच्या जगण्यात दिव्यांगांना येणाऱ्या अडचणींची जाण यावी यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने शताब्दी वर्षानिमित्त देवरूखमध्ये प्रथमच जिल्हास्तरीय सहसंवेदना सजगता कार्यशाळा आयोजित केली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, दिव्यांग मुलांचे पालक व कुटुंबीय, विशेष शिक्षक, समुपदेशक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्राचे विद्यार्थी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि संवेदनशील नागरिक यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
दिव्यांग क्षेत्रात गेली ३० वर्षे कार्यरत असणाऱ्या स्वागत थोरात यांची ही संकल्पना असून तेच कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. कार्यशाळेच्या समन्वयक पुण्याच्या सौ. स्वरूपा गोखले-देशपांडे असून त्या व देवरूखच्या रेवा कदम या सहाय्यक प्रशिक्षक आहेत. प्रा. डॉ. वर्षा शिरीष फाटक यांनी कार्यशाळेचे संयोजन केले आहे.
ही एक दिवसीय कार्यशाळा २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत होणार आहे. कार्यशाळेमध्ये अपंगत्वाचे विविध प्रकार व त्यांतील आव्हाने, दया नव्हे, सहसंवेदना विकसित करण्याचे महत्त्व, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, ज्ञानेंद्रियांचा प्रभावी वापर, सांघिक भावना विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ पालक, गुरुजन व नागरिकांशी कशा प्रकारे संवाद साधावा, समावेशकता यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध अनुभवाधारित उपक्रम, प्रात्यक्षिके आणि सहभागात्मक सत्रांचाही समावेश आहे.
नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 9405069246 या क्रमांकावर किंवा कार्यवाह शिरीष फाटक (9405069236) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत व आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे.कार्यशाळा देवरूखच्या सावरकर चौकात सृजन सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरमध्ये होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी