
पुणे, 14 सप्टेंबर (हिं.स.) - मावळच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व, माजी मंत्री मदन बाफना यांचे दीर्घ आजारपणामुळे आज, सोमवारी निधन झाले. बाफना यांनी मावळच्या राजकारणात प्रदीर्घ काळ सक्रिय भूमिका बजावली. आमदार म्हणून काम करताना त्यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली. त्यानंतर मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. मावळच्या विकासाशी संबंधित अनेक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री म्हणून ॲड. मदन बाफना यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९६७ मध्ये एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलीबरोबरच सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मैत्री झाली. पुढे ही मैत्री राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ सहकार्यामध्ये रूपांतरित झाली. बाफना यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली. त्यांनी मावळ तालुका काँग्रेस कमिटी तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९७७ मध्ये पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले.
मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९८५ आणि १९९० मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. अशा प्रकारे त्यांनी मावळचे दोनदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. आमदारकीच्या काळात त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी महसूल राज्यमंत्री तसेच परिवहन राज्यमंत्री म्हणून काम केले. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी जमीनविषयक प्रश्न आणि महसूल प्रशासनाशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष दिले. मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्यावेळी ॲड. मदन बाफना हे पवारांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शरद पवार यांचे विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख होती.
राजकारणासोबतच ॲड. मदन बाफना यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिले. वडगाव येथील संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. मावळ आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासनाची जाण असलेले ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ॲड. मदन बाफना यांचा आदर होता. कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेली भूमिका यामुळे त्यांचे मावळच्या जनमानसाशी घट्ट नाते निर्माण झाले होते. त्यांच्या निधनाने मावळने अनुभवी राजकीय नेतृत्व, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडून श्रद्धांजली
आदरणीय पवार साहेबांचे सहकारी तथा माजी राज्यमंत्री मदन बाफना साहेब यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी मावळ तालुक्याचे प्रदिर्घ काळ नेतृत्व केले. उत्तम जनसंपर्क तथा सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते अशी त्यांची ओळख होती. स्पष्टवक्तेपणा आणि मनमोकळं दिलखुलास वागणं-बोलणं ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्यं होती. त्यांच्या निधनामुळे बाफना कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी