

रत्नागिरी, 14 सप्टेंबर (हिं.स.) । गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यात लाडक्या गणरायाचे वाजतगाजत आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची सजावट, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या बाप्पाचे उत्साहात स्वागत केले.
गणरायाच्या आगमनासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार तयारी सुरू होती. घराघरांत आकर्षक सजावट करण्यात आली असून, गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी मंडप व पूजास्थळे सजविण्यात आली आहेत. सकाळपासूनच गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांची लगबग शहरातील प्रमुख मार्गांवर पाहायला मिळाली. रत्नागिरीजवळच्या कर्ला-आंबेशेत येथील सुमारे १२५ गणेशमूर्तींची सवाद्य मिरवणूक रत्नागिरी शहरातून काढण्यात आली. गेली ४१ वर्षे गणपतीच्या आगमनाची ही मिरवणूक काढली जात आहे. कर्ला आणि आंबेशेत परिसरातील घरोघरच्या गणेशमूर्ती मिरवणुकीने घरोघरी नेल्या जातात. सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशे, लेझीम तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. महिला, पुरुष, युवक तसेच बालगोपाळांनी उत्साहात सहभागी होत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.
जिल्ह्यात एक लाख ६६ हजार ५८५ घरगुती, तसेच ११० ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुढील दिवसांत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी