वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस; दोन मार्गांवरील वाहतूक ठप्प
वर्धा, १४ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावत काही भागांत अतिवृष्टी झाली. विशेषतः हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. स्थानिक नाले ओसंडून वाहू लागल्याने ग्रामीण भागातील दोन प्रमुख
हिंगणघाट, समुद्रपुरातील दोन मंडळात अतिवृष्टी


वर्धा, १४ सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावत काही भागांत अतिवृष्टी झाली. विशेषतः हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. स्थानिक नाले ओसंडून वाहू लागल्याने ग्रामीण भागातील दोन प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी मंडळात सर्वाधिक १४८ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर हिंगणघाट तालुक्यातील पोहणा मंडळात ७१.३ मि.मी. पाऊस झाला. संततधारेमुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

हिंगणघाट तालुक्यातील मौजा पिपरी येथील स्थानिक नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच समुद्रपूर तालुक्यातील मौजा सावंगी येथील नाल्यालाही पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत पूर ओसरेपर्यंत संबंधित मार्गांवरून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाची ओढ

यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १३२.२ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली असून, ते सरासरीच्या ७५.९ टक्के आहे. जुलैमध्ये २९९.८ मि.मी. म्हणजेच १०९.६ टक्के पाऊस झाला. ऑगस्टमध्ये मात्र केवळ ६०.६ मि.मी. म्हणजे २२.३ टक्के, तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ४६.८ मि.मी. म्हणजे २५.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पावसाच्या कमतरतेमुळे शेतकरी चिंतेत असताना शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांच्या काठावरील शेतजमिनीतील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande