परळीतील घणशी व ब्रह्मगंगा नदी पुनर्जीवनासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन
बीड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ येथील घणशी (वेणूमती) आणि ब्रह्मगंगा या दोन नद्यांच्या खोलीकरण, सरळीकरण व पुनर्जीवनासाठी दि. १५ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी यांच्या प्रम
बैठकीचे आयोजन


बीड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। परळी वैजनाथ येथील घणशी (वेणूमती) आणि ब्रह्मगंगा या दोन नद्यांच्या खोलीकरण, सरळीकरण व पुनर्जीवनासाठी दि. १५ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता नगर परिषदेच्या डॉ. भालचंद्र वाचनालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.

परळी शहराच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने घणशी आणि ब्रह्मगंगा या दोन्ही नद्यांना विशेष महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर नदी खोलीकरण, सरळीकरण, जलस्रोतांचे संवर्धन आणि नदीपात्राचे पुनरुज्जीवन याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. विशेषतः लोकसहभागातून नदी पुनर्जीवनाचे व्यापक अभियान उभारण्याबाबत बैठकीत दिशा ठरविण्यात येणार आहे. नदी पुनर्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन, नागरिकांचा सहभाग आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी प्रभावी कृती आराखडा यावर विचार विनिमय होणार आहे. मयंक गांधी हे जलसंवर्धनाच्या क्षेत्रातील आपल्या अनुभवातून परळीकरांना मार्गदर्शन करणार असून, नदी पुनर्जीवनाच्या कार्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. या बैठकीस पर्यावरणप्रेमी, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, युवक, जलसंवर्धन कार्यकर्ते आणि नदी पुनर्जीवनासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande