अमरावतीच्या तळेगाव ठाकूरमध्ये बिबट्याचा वाढता वावर
शेतातील खोपडीनजीक आढळले पायांचे ठसे शेतकरी-शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण अमरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) : तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव ठाकूर मौजा
तळेगाव ठाकूरमध्ये बिबट्याचा वाढता वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण..


शेतातील खोपडीनजीक आढळले पायांचे ठसे शेतकरी-शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) :

तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव ठाकूर मौजा येथील शेतकरी प्रकाश विजयकर यांच्या शेतातील रखवालदाराच्या राहत्या खोपडीनजीक सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी सकाळी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, सकाळच्या सुमारास रखवालदाराला खोपडीनजीक काही प्राण्यांच्या पायांचे ठसे दिसून आले. हे ठसे बिबट्याचे असावेत, असा संशय आल्याने त्याने तत्काळ शेतमालक प्रकाश विजयकर यांना माहिती दिली. विजयकर यांनी याबाबत वनविभागाला कळविले.

माहिती मिळताच तिवसा येथील वनपाल सोमेश्वर घोरमाडे, वनरक्षक आकाश माहुरे तसेच परिसरातील काही शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठशांची पाहणी करून तपासणी केली असता ते बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध वन्यप्राण्यांच्या पायांच्या ठशांबाबत मार्गदर्शन केले. वाघ, बिबट्या तसेच अन्य वन्यप्राण्यांच्या ठशांमधील फरक समजावून सांगत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्यात आला.

बिबट्याच्या डरकाळीसदृश आवाजाने शेतकरी घाबरले

दरम्यान, तळेगाव मौजा येथील शेतकरी नंदकिशोर कडव हे रविवार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजता शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळच्या परिसरातून त्यांना बिबट्याच्या डरकाळीसदृश आवाज ऐकू आला. अचानक आलेल्या या आवाजामुळे घाबरलेल्या कडव यांनी शेतातून तातडीने घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर परिसरात बिबट्याच्या वावराची चर्चा अधिकच वाढली आहे.

शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये

बिबट्याच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने शेतकरी आणि शेतमजुरांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतात जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये, अंधाराच्या वेळी विशेष काळजी घ्यावी तसेच रात्रीच्या वेळी शेत परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ जाऊ नये अथवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.

बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असून, वनविभागाने परिसरात अधिक दक्षता घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande