

रायगड, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
दहिवली परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अखेर कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गटनेते तथा नगरसेवक ॲड. संकेत भासे, नगरसेविका जान्हवी सुदेश देवघर तसेच 'दहिवली गाव विचार मंच' यांनी १६ जानेवारी रोजी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून परिसरातील प्रमुख ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.
हे सीसीटीव्ही थेट कर्जत पोलीस ठाण्याच्या नियंत्रणाखाली राहणार असल्याने या भागातील प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार किंवा गैरवर्तन घडल्यास समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करणे पोलिसांना सुलभ होणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. यामुळे भाविक आणि विसर्जन मिरवणुकांसाठी येणाऱ्या वाहनांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन ॲड. संकेत भासे व जान्हवी देवघर यांनी पुढाकार घेत रस्त्यावर तातडीने जीएसबी (GSB) खडी आणि भराव टाकून मार्ग पूर्णपणे सपाट व सुकर करून दिला.
सीसीटीव्ही यंत्रणेमुळे परिसरातील सुरक्षिततेची खात्री मिळाल्याने आणि विसर्जन मार्ग व्यवस्थित झाल्याने गणेशभक्तांची गैरसोय टळली असून, स्थानिक नागरिकांनी या तत्पर कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)