
मरावती, १४ सप्टेंबर (हिं.स.) : वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आणि कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या महानुभाव अध्यासन केंद्र आणि सर्वज्ञ सेवा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री चक्रधर स्वामी अवतार दिना’निमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण न देता व्याख्यान रद्द करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल रिसर्च सेंटरच्या सभागृहात १५ सप्टेंबर रोजी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे राहणार होते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यक्रमाच्या काही काळ आधी व्याख्यान रद्द करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर बंडगर यांना देण्यात आली.
व्याख्यान रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगर यांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. आपण वारकरी संप्रदायातील समतावादी विचार मांडत असल्याने काही जणांनी आपल्याविषयी गैरसमज निर्माण केल्याचा दावा त्यांनी केला.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयी माझे व्याख्यान होणार होते. विद्यापीठ प्रशासनाकडून व्याख्यान रद्द करण्यात आल्याचे मला कळविण्यात आले. मला रीतसर निमंत्रण देण्यात आले होते आणि कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र, अचानक व्याख्यान रद्द झाल्याने वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया बंडगर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, व्याख्यान रद्द करण्यामागे नेमके कारण काय, तसेच विद्यापीठ प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला का, याबाबत समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, व्याख्यान रद्द करण्यामागील अधिकृत कारण विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी