भाषिक विविधता हीच भारताची ताकद, हिंदी दिनानिमित्त अमित शाह यांचा संदेश
नवी दिल्ली , 14 सप्टेंबर (हिं.स.)।हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. भारतातील भाषिक विविधता आणि सांस्कृतिक समृद्धीचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले की, देशात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा ही कोणतीही कमजोरी
भाषिक विविधता हीच भारताची ताकद, हिंदी दिनानिमित्त अमित शाह यांचा संदेश


नवी दिल्ली , 14 सप्टेंबर (हिं.स.)।हिंदी दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. भारतातील भाषिक विविधता आणि सांस्कृतिक समृद्धीचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले की, देशात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा ही कोणतीही कमजोरी नसून भारताची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक भाषा आपल्यासोबत इतिहास, लोकपरंपरा आणि जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन घेऊन पुढे जाते. या सर्व भाषा मिळून नव्या पिढीच्या मूल्यांना आकार देतात. त्यांच्या मते, भारतातील भाषिक विविधताच देशातील ‘विविधतेत एकता’ची भावना अधिक मजबूत करते.

गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, हिंदीचा उद्देश इतर भारतीय भाषांशी स्पर्धा करणे हा नाही. त्याऐवजी देशातील विविध भाषांमध्ये अर्थपूर्ण संवाद वाढवणे आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे, यासाठी हिंदी महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. भारताचा इतिहास याचा साक्षीदार आहे की, वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या लोकांनी हिंदीला व्यापक संवादाची भाषा बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अमित शाह यांनी तरुणांना जगातील जास्तीत जास्त भाषा शिकण्याचे, मात्र त्याचवेळी आपल्या मातृभाषेचा त्याग न करण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनी मुलांशी आपल्या मातृभाषेत संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषेत बोलताना कोणालाही हीन भावना वाटू नये, कारण भाषा आपल्याला आई, माती, इतिहास आणि संस्कृतीशी जोडते, असे शाह यांनी म्हटले.

अमित शाह यांनी सांगितले की, १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हिंदीचा संघाच्या राजभाषेच्या रूपात स्वीकार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होण्याच्या’ आवाहनात भाषेची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजपथाचे नामकरण ‘कर्तव्य पथ’ करणे आणि नवीन कायद्यांना भारतीय आत्मसन्मानाशी जोडणे, याचाही त्यांनी उल्लेख केला.आपल्या मातृभाषेचा उल्लेख करताना अमित शाह म्हणाले की, त्यांची मातृभाषा गुजराती आहे. मात्र, देशाच्या कोणत्याही भागात गेल्यावर सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्यासाठी हिंदी महत्त्वाची भूमिका बजावते.

स्वातंत्र्यानंतर भारतीय भाषांनी राष्ट्रनिर्माण, प्रशासन आणि विकासाची प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हिंदीसह सर्व भारतीय भाषांनी जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याच्या आदर्शांना पुढे नेण्यात योगदान दिले आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.भारतीय भाषांचा सन्मान करणे हा केवळ भाषेचा विषय नाही, तर तो देशाची संस्कृती, इतिहास आणि आत्मगौरवाशी संबंधित मुद्दा आहे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

स्वामी दयानंद सरस्वती यांचे उदाहरण देताना शाह यांनी सांगितले की, त्यांची मातृभाषा गुजराती होती; मात्र त्यांनी आपला प्रसिद्ध ग्रंथ ‘सत्यार्थ प्रकाश’ हिंदीमध्ये लिहिला. हिंदीच्या विकासात केवळ हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांचेच योगदान नाही, हे यावरून स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

महात्मा गांधी यांच्या योगदानाचाही गृहमंत्र्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी १९१८ मध्ये मद्रास येथे ‘दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा’ची स्थापना केली होती. दक्षिण भारतात हिंदीच्या प्रचार-प्रसाराला चालना देणे हा या संस्थेचा उद्देश होता.अमित शाह यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेही उदाहरण दिले. नेताजींची मातृभाषा बंगाली होती; मात्र त्यांनी आझाद हिंद फौजेत संवादासाठी हिंदीचा वापर केला आणि देशाला ‘जय हिंद’सारखा घोष दिला, असे त्यांनी सांगितले.वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक महान व्यक्तींनी हिंदीला जनसंवादाची भाषा म्हणून मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्या महापुरुषांची मातृभाषा हिंदी नव्हती, त्यांचे योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande