
लातूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात लातूर पोलिसांनी यंदा गणपती बाप्पांकडे एक आगळेवेगळे आणि सामाजिक संदेश देणारे साकडे घातले आहे. “गणपती बाप्पा, लातूरकरांना हेल्मेट वापरण्याची सुबुद्धी दे!” अशी भावनिक साद लातूर पोलिसांनी बाप्पांच्या चरणी घातली आहे.
लातूर जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी ही चिंतेची बाब बनली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातांमध्ये गंभीर दुखापत होण्याचे तसेच जीवितहानीचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस विभागाने हेल्मेट वापराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली होती.
गेल्या काही महिन्यांपासून लातूर पोलिसांकडून विविध माध्यमांतून नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात येत होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः याबाबत सातत्याने जनजागृती केली. नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, हा केवळ पोलिसांचा नियम नसून प्रत्येकाच्या जीवनाच्या सुरक्षेशी संबंधित विषय आहे, हे नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, व्यापक जनजागृती करूनही हेल्मेट वापराबाबत अपेक्षित बदल होत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून लातूर जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबर २०२६ पासून सुरुवात करण्यात आली. प्रारंभी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमातून हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईमागे नागरिकांकडून दंड वसूल करणे हा पोलिसांचा उद्देश नसून नागरिकांचे प्राण वाचविणे हा मुख्य उद्देश आहे, अशी भूमिका लातूर पोलिसांनी स्पष्ट केली आहे. हेल्मेट हे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठीचे साधन नसून अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे.
“हेल्मेट हे ओझे नसून कुटुंबाचे सुरक्षा कवच आहे,” हा संदेश लातूर पोलिसांकडून नागरिकांपर्यंत पोहोचविला जात आहे. एखाद्या व्यक्तीने हेल्मेट घातले म्हणजे तो केवळ स्वतःचेच नव्हे, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करीत असतो. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने घराबाहेर पडताना हेल्मेटला वाहनाइतकेच महत्त्व द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने याच संदेशाला भावनिक आणि भक्तीची जोड देत लातूर पोलिसांनी गणरायाकडे साकडे घातले आहे. गणपती बाप्पा हा बुद्धी आणि विवेकाची देवता मानला जातो. त्यामुळे “बाप्पा, लातूरकरांना हेल्मेट वापरण्याची सुबुद्धी दे,” अशी प्रार्थना करत लातूर पोलिसांनी नागरिकांच्या मनातील हेल्मेटबाबतची उदासीनता दूर व्हावी आणि प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वयंस्फूर्तीने हेल्मेट वापरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
“बाप्पा, प्रत्येक लातूरकराला नियमांची भीती म्हणून नव्हे, तर आपल्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी म्हणून हेल्मेट घालण्याची सुबुद्धी दे,” हा लातूर पोलिसांचा संदेश यंदाच्या गणेशोत्सवात विशेष लक्षवेधी ठरत आहे.
पोलिसांच्या मते, रस्त्यावर होणारा प्रत्येक अपघात हा केवळ आकडा नसतो. त्यामागे एक कुटुंब, अनेक नाती आणि अनेकांच्या आयुष्याशी जोडलेली स्वप्ने असतात. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना काही मिनिटांची घाई किंवा हेल्मेट न घालण्याची छोटीशी निष्काळजीपणा आयुष्यभराची हानी करू शकतो.
लातूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दुचाकीचा प्रत्येक प्रवास हेल्मेटशिवाय करू नका. घरातून बाहेर पडताना हेल्मेट सोबत घेण्याची नव्हे, तर ते डोक्यावर घालण्याची सवय लावा. स्वतःचा जीव सुरक्षित ठेवा, आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवा आणि रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे.
“गणपती बाप्पा मोरया... लातूरकरांना हेल्मेट वापरण्याची सुबुद्धी दे!” असा सामाजिक सुरक्षेचा संदेश देत लातूर पोलिसांनी यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पांच्या चरणी हे आगळेवेगळे साकडे घातले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis