
* राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त ३६ जिल्ह्यांसह विविध राज्ये, नवी दिल्ली आणि दुबईत ‘लोककलेतील श्रीगणेश’चे आयोजन
मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा, भक्तीपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा राज्याच्या सीमांपलीकडे तसेच देश-विदेशातील रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यांमध्ये, नवी दिल्ली आणि दुबई येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साकारण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव असून, या उत्सवाशी जोडलेल्या लोककला, संगीत, नृत्य, भक्तिगीते आणि पारंपरिक कलाविष्कारांमधून महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते. राज्यातील विविध भागांतील लोककलावंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनुभूती देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमधून स्थानिक लोककला, पारंपरिक नृत्य, संगीत आणि भक्तिपरंपरेचे सादरीकरण करण्यात येणार असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला राज्याच्या सीमा ओलांडून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देहरादून, उत्तराखंड येथे दि. १६ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी येथे पारंपरिक ढोल-ताशा वादनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
जम्मू, जम्मू-काश्मीर येथे दि. १८ सप्टेंबर रोजी पद्मश्री पद्मा सचदेव शासकीय महाविद्यालय सभागृह, गांधीनगर येथे लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
चेन्नई, तमिळनाडू येथे दि. २० सप्टेंबर रोजी कृष्णा गणा सभा येथे नमन, गण, जाखडी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागरण-गोंधळ आदी लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव येथे दि. २१ सप्टेंबर रोजी कला केंद्र, बाल उद्यानासमोर लेझीम, गण-गौळण, बाल्या नृत्य, शास्त्रीय नृत्य आणि विविध गीतांचे सादरीकरण होणार आहे.
लखनऊ, उत्तर प्रदेश येथे दि. २१ सप्टेंबर रोजी कैसरबाग येथील राय उमानाथ बली प्रेक्षागृहात गणेश वंदना, नमन, ओवी, मंगळागौर, गोंधळ, बाल्या नृत्य, गौरी-गणपती हिंदी रचना, भजने तसेच संगीतमय नृत्यनाट्य सादर करण्यात येणार आहे.
कोटा, राजस्थान येथे दि. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रीयन समाज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह, डडवाडा येथे नमन, गण, जाखडी, धनगरी व कोळी नृत्य तसेच जागरण-गोंधळ यांचे सादरीकरण होणार आहे.
अमरावती, आंध्र प्रदेश येथे दि. २२ सप्टेंबर रोजी वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी–AP येथे नमन, गण, जाखडी, धनगरी व कोळी नृत्य तसेच जागरण-गोंधळ सादर करण्यात येणार आहे.
कोलकाता, पश्चिम बंगाल येथे दि. २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र निवासातील टिळक हॉल, हाजरा रोड येथे प्रार्थना, गणपती स्तवन, नमन, ओवी, मंगळागौरीची गाणी, भक्तिगीते, गीतरामायण, पारंपरिक लोकसंगीत, देवीचा गोंधळ, कोळीगीते आणि देशभक्तीपर गीते यांची सांस्कृतिक मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
हैदराबाद, तेलंगणा येथे दि. २३ सप्टेंबर रोजी भारतीय विद्या भवन, किंगकोटी येथे ‘महा गणेशोत्सव – महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ या संकल्पनेअंतर्गत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्लीत महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीची मेजवानी
गणेशोत्सवानिमित्त नवी दिल्ली येथेही महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचे विविध पैलू सादर करणाऱ्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १५ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगायन, संसद मार्ग येथे प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांचा ‘सही रे सही’ या मराठी नाटकाचा प्रयोग सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत होणार आहे.
दि. १७ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगायन, संसद मार्ग येथे वैभव जोशी आणि संदीप खरे यांच्या सहभागातून मराठी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
दि. १८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग येथे महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संतोष भांगरे यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोककलेचे विविध पैलू रसिकांसमोर येणार आहेत.
दि. २० सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर, जनपथ येथे वैशाली सामंत, ऋषीकेश कानडे, शरयू दाते व इतर गायकांच्या सहभागातून मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
दि. २३ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगायन, संसद मार्ग येथे प्रमिला लोदगेकर यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध लावणी परंपरेचा जागर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांमधून राजधानी नवी दिल्लीतील नागरिक, मराठी बांधव आणि सांस्कृतिक रसिकांना महाराष्ट्राच्या नाट्य, संगीत, लोककला, लावणी आणि चित्रपट संगीताची वैविध्यपूर्ण अनुभूती घेता येणार आहे.
दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा आंतरराष्ट्रीय जागर
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्याच्या दृष्टीने दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे दि. २६ सप्टेंबर रोजी सायं. ६ वाजता स्विस इंटरनॅशनल ऑडिटोरियम येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नमन, गण, जाखडी नृत्य, मंगळागौर, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य आणि जागरण-गोंधळ आदी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला आणि लोकपरंपरांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच राज्याबाहेरील तसेच देशाबाहेरील मराठी बांधव आणि स्थानिक रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विविध प्रदेशांमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी समाजासाठी हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ करणारे ठरणार आहेत.
मुंबईत शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी
राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची विशेष मेजवानी अनुभवता येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. १७ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दररोज सायंकाळी ६.३० वाजता मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.
महोत्सवात सुभद्रा देसाई, एस. आकाश, मेहताब अली नियाझी, स्वर शर्मा, अनुजा झोकरकर, नूपुर गाडगीळ, नागेश आडगावकर, मृणालिनी देसाई, गंधार देशपांडे, प्राजक्ता मराठे, यज्ञेश रायकर, धनंजय हेगडे, यशवंत वैष्णव, सुखद मुंडे, विनय रामदासन, अभिषेक बोरकर, केदार केळकर, अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी आदी नामवंत कलाकारांचे गायन व वादन सादर होणार आहे.
गायन, बासरी, सतार, रुद्रवीणा, व्हायोलिन, तबला, पखावज आणि सरोद अशा विविध वाद्य व गायन प्रकारांमधून अभिजात शास्त्रीय संगीताची वैविध्यपूर्ण अनुभूती रसिकांना घेता येणार आहे.
हा व्यापक सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा, शास्त्रीय संगीत आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध कला-सांस्कृतिक वारशाचा देशाच्या विविध भागांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी परिचय करून देण्यात येणार आहे.
या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून, संबंधित शहरांतील नागरिक, मराठी बांधव आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी